
गेल्या काही दिवसांपासून ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रातील एका जगप्रसिद्ध नियतकालिकाची ( मेडिकल जर्नल ) आपल्या देशात सर्वत्र चर्चा सुरु आहे. या ‘लॅन्सेट’ने ४ मे च्या अंकातील आपल्या संपादकीयात कोविडच्या महामारीच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारताच्या झालेल्या सध्याच्या भयानक व दयनीय अशा परिस्थितीचे, तसेच बोजवारा उडालेल्या भारतातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे एक विदारक असे चित्र जगापुढे उभे केले असून, त्यामुळे आपल्या देशाची संपूर्ण जगतात भारत एक ‘प्रगत देश’ किंवा ‘भविष्यातील एक सुपर पॉवर’ अशी म्हणून जी काही एक प्रतिमा तयार होत होती, त्या प्रतिमेला जबरदस्त असा धक्का पोहोचलेला आहे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘लॅन्सेट’च्या ४ मेच्या अंकातील या एका संपादकीयामुळे, सगळे जग एकदम खडबडून जागे झाले असून आपल्या देशाकडे बघण्याच्या जगांतील अनेक राष्ट्रांच्या दृष्टीकोनात हळुहळू बदल होत असल्याचे आता दिसू लागले आहे.
‘लॅन्सेट’ आपल्या ४ मे च्या या संपादकीयात म्हणते, कोविड महामारीच्या या दुसऱ्या लाटेमुळे झालेली भारताची अवस्था ही भयानक असून, आकलन शक्तीच्या पलिकडची आहे. भारताची सध्याची ही अवस्था म्हणजे, ही त्या देशावरील एक राष्ट्रीय आपत्ती असून, कोविडच्या या महामारीमुळे या घडीला भारतात २ कोटींपेक्षाही अधिक लोक संक्रमित झालेले असून दररोज ३.७५ लाख लोकांची या रुग्णसंख्येत भरच पडत आहे. त्यातच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भारतात असून त्यामुळे कित्येक रुग्ण हे भारताच्या खेड्यापाड्यातच नव्हे तर भारताच्या महत्वाच्या शहरातील अनेक रुग्णालयांतही या ऑक्सिजनभावी तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या खेड्यापाड्यात, भारताच्या महत्वाच्या शहरातील रुग्णालयांतुन, या रुग्णांकरिता बेड्सही उपलब्ध नाहीत, व तसेच इतक्या संख्येतील रुग्णांवर उपचार करण्याकरिता डॉक्टर्स व नर्सेस यांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे दररोज हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागत असून भारतात या महामारीमुळे आजमितीस लक्षावधी लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व दिवसेंदिवस मृतांची संख्या वाढतच आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांचा हा वेग जर असाच राहिला तर, १ ऑगस्ट पर्यंत भारतात सुमारे १० लक्ष लोक या महामारीत मृत्युमुखी पडण्याचा अंदाजही या नियतकालिकाने वर्तविलेला आहे आणि त्या संदर्भात मोदी सरकारवर आणि पंतप्रधान मोदींच्या कोविड च्या परिस्थितीला हाताळण्याच्या कार्यपद्धतीवरही ‘लॅन्सेट’ने सडकून टीका केली आहे.

‘लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रांतील एका महत्वाच्या आणि जगप्रसिद्ध अशा साप्तहिकाने भारतातील कोविड च्या दुसऱ्या लाटेच्या या महामारीच्या संदर्भातील हा अग्रलेख आपल्या ४ मे च्या त्यांच्या अंकात प्रसिद्ध केला आणि देशात आणि जगातील अनेक राष्ट्रांत सर्वत्र एकच खळबळ उडाली. केवळ आपल्या देशातीलच नव्हे, तर जगातील अनेक वर्तमानपत्रांनी आणि भारतातील दूरदर्शनवरील प्रत्येक वाहिन्यांनी, तसेच अगदी बीबीसी, सीएनएन या सारख्या आंतरराष्ट्रीय वाहिन्यांनी देखील ‘लॅन्सेट’ने लिहिलेल्या या संपादकीयाची दखल घेत त्यावर चर्चा सुरु केली. भारतातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांनी ‘लॅन्सेट’च्या या अग्रलेखाला व टीकेला आपापल्या वर्तमानपत्रात ठळक मथळे देत प्रसिद्धी दिली आणि एव्हढेच नव्हे तर, आपापली मते व्यक्त करणारे परखड अग्रलेखही लिहिले. या सगळ्यामुळे ‘लॅन्सेट’ या साप्तहिकाची सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली आणि ‘लॅन्सेट’ हे आहे तरी काय, असा एक प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उभा राहिला व या वैद्यकीय नियतकालिकाविषयीचे एक कुतूहलही आपल्याकडे अनेकांच्या मनात निर्माण झाले.
माझ्या अनेक मित्रांनी देखील मला फोन करून या ‘लॅन्सेट मेडिकल जर्नलची’ विश्वासार्हताही विचारली आणि त्यांच्या या संपादकीय लेखाची जगात किती दखल घेतली जाऊ शकते असा एक प्रश्नही विचारला व त्यामुळे माझ्या त्या सर्व मित्रांसाठी व इतरही वाचकांसाठी जगाच्या वैद्यकीय क्षेत्रांतील या एका महत्वाच्या आणि जगप्रसिद्ध अशा ‘लॅन्सेट’ मेडिकल जर्नलविषयीची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देत आहे.
लॅन्सेटमधील हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनेक समर्थकांनी या मेडिकल जर्नलच्या एकूणच विश्वासार्हतेवर अनेक प्रश्न व प्रश्नचिन्ह उभी केलेली आहेत. त्यांचे ते प्रश्न हे कितपत योग्य आहेत की अयोग्य याची मी येथे चर्चा करणार नाही. हे प्रत्येकाने मी ‘लॅन्सेट’विषयी देत असलेली ही माहिती वाचून स्वतःच ठरवावे. त्यातही ‘लॅन्सेट’मधील हा लेख म्हणजे चीनचे कारस्थान आहे असेही कोणीतरी ट्विट केल्याचे माझ्या वाचनात आले. ते काही असो, पण पंतप्रधानावरील एक वैयक्तिक टीका जरी सोडली वा आपण काही क्षणांपुरती दुर्लक्षित केली, तरीही कोविडची सध्याची भारतातील वस्तुस्थिती, ही लॅन्सेटमधील त्या लेखात लिहिलेल्या वा वर्णन केलेल्या केलेल्या वस्तुस्थितीपासून फार काही वेगळी आहे असे मला अजिबात वाटत नाही.

अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेविषयीची माहिती देणारा लेख
मित्रहो, तसं पाहिलं तर आपल्या देशात कोविड १९ या महामारीच्या आलेल्या पहिल्या लाटेमध्येच या ‘लॅन्सेट’ जर्नलने अशा महामारीला तोंड देण्याकरिता भारतात असलेल्या अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेविषयीची माहिती देणारा एक लेख गेल्या वर्षी त्यांच्या एका अंकात लिहिला होता. पण तो लेख त्यावेळी फार कुणाच्या वाचनात आलेला नसावा. त्या लेखात ‘लॅन्सेट’ने भारतातील आरोग्य सेवेकडे होत असलेल्या अक्षम्य अशा दुर्लक्षाबद्दल भारत सरकारवर टीकाही केली होती. तसेच भारताच्या वार्षिक बजेटमधील आकडेवारीचा हवाला देत, भारतात नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेवर भारताच्या वार्षिक अंदाजपत्राच्या केवळ २ टक्के इतकाच तुटपुंजा खर्च केला जातो व ते योग्य नाही,अशी जळजळीत टीकाही केली होती. आरोग्यसेवेकडे होत असलेल्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे भारताची आरोग्य सेवा भारताच्या ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात अजूनही पोहोचलेली नाही व त्याकडे भारत सरकारने लक्ष न दिल्यास, पुढील काळात भारताला अधिक वाईट व गंभीर संकटाला सामोरे जावे लागेल असा एक इशाराही त्यांनी गेल्यावर्षीच्या त्या लेखात दिलेला होता. लॅन्सेटच्या त्या लेखाचा संदर्भ देत मी गेल्या वर्षी ‘भारताला आरोग्य सेवेचे जाळे वाढविण्याची गरज आहे’ असा एक लेख व्हाटसअॅपवर लिहिला देखील होता.
पण लॅन्सेटसारख्या या जर्नलने दिलेल्या, भारताने आरोग्य सेवेकडे अधिक गंभीरपणे लक्ष दिलेलं पाहिजे, या इशाऱ्याकडे आपण दुर्लक्ष केले आणि आपल्या आरोग्य सेवेत फार काही सुधारणा केल्या नाहीत. पुढे या सगळ्या काळात गेल्या वर्षी भारताने कोविडच्या पहिल्या लाटेचा यशस्वी सामना केला आणि जगभरात त्याची प्रसिद्धी करत आपण आपली पाठही थोपटून घेतली. पण मात्र, या वर्षीच्या फेब्रुवारीत भारतात आलेल्या कोविडच्या या दुसऱ्या लाटेच्या भयंकर त्सुनामीने मात्र सगळा देशच हडबडून गेला.एव्हढेच नव्हे तर सारे जगही हडबडले. त्यामुळे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की लॅन्सेट हे नियतकालिक वस्तुनिष्ठ, वास्तवावर, वस्तुस्थितीवर आधारित व एकूणच परिस्थितीचा अभ्यास करून, त्याचे आकलन करूनच आपले लेख लिहिते व त्यामुळेच लॅन्सेट हे वैद्यकीय नियतकालिक (मेडिकल जर्नल) आपल्या या विश्वासार्हतेविषयी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे साहजिकच लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक लेखाची आणि मजकुराची जगभर दाखल घेतली जाते.
लॅन्सेट मेडिकल जर्नलची सुरुवात व स्थापना :
अशी वर्षानुवर्षे आपली विश्वासार्हता राखलेल्या या मेडिकल जर्नलची सुरुवात व स्थापना १८३२ मध्ये थॉमस वेक्ली नावाच्या एका इंग्लिश सर्जनने केली आणि या जर्नलचे नाव त्याने ‘लॅन्सेट मेडिकल जर्नल’ असे ठेवले. ‘लॅन्सेट’ हा वैद्यकीय क्षेत्रातील, सर्जन लोकांना म्हणजे शल्यविशारदांना, परिचित असलेला असा एक शब्द आहे. ‘लॅन्सेट’ म्हणजे रुग्णांची शस्त्रक्रिया करताना त्या रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग कापण्यासाठी शल्यविशारद म्हणजेच सर्जन वापरत असलेली असलेली सुरी अथवा धारदार पाते. तर या जगप्रसिद्ध असलेल्या ‘लॅन्सेट’ जर्नलमध्ये म्हणजे नियतकालिकात औषधी क्षेत्रांतील मूलभूत संशोधने व त्यावरील संशोधनपर लेख, या क्षेत्रातील परीक्षणे व परीक्षणात्मक लेख, पुस्तक परीक्षणे, जगभरांतील नवनवीन संशोधने, वैद्यकीय क्षेत्रांतील नवनवे बदल, होणारे महत्वाचे सेमिनार्स म्हणजे जगभरातील डॉक्टरांच्या परिषदा व त्यांची माहिती, त्यावरील वार्तापत्रे, या परिषदांतून जाहीर झालेले अहवाल, केस पेपर्स, वैद्यकीय संशोधने इत्यादी वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाची अशी माहिती व त्यावरील वार्तांकने आणि संपादकीय असा भरगच्च मजकूर असतो. इंग्लंडमध्ये राहत असलेले रिचर्ड हॉर्टन हे या ‘लॅन्सेट’चे १९९५ पासून म्हणजे, गेली २६ वर्षे प्रमुख संपादक आहेत. या लॅन्सेटची लंडन, न्यूयॉर्क, बीजिंग इत्यादी ठिकाणी कार्यालये आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील जगभरात प्रसिद्ध होणाऱ्या सुमारे १६५ नियतकालिकात लॅन्सेट हे आज दुसऱ्या क्रमांकावरील मेडिकल जर्नल म्हणजे वैद्यकीय नियतकालिक आहे.
लॅन्सेट मेडिकल जर्नलची मालकी
या लॅन्सेट मेडिकल जर्नलची मालकी नेदरलँड या देशांतील,वैद्यकीय, तांत्रिक आणि शास्त्रीय विषयावरील संशोधन करणाऱ्या ‘एल्सविर’ या एका जगप्रसिद्ध कंपनीकडे १९९१ पासून असून ही कंपनी ‘लॅन्सेट’ या मेडिकल जर्नल व्यतिरिक्त ‘सेल’, ‘करंट’, ‘ओपिनियन’, ‘ट्रेंड्स’ अशा नावांचीही मेडिकल जर्नल्स जगभर प्रकाशित करत असते. या ‘एल्सविर’ कंपनीच्या ‘सायन्स डायरेक्ट’ आणि ‘स्कुपस’ या नावाच्या जगप्रसिद्ध अशा व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या अशा वेबसाइट्सही आहेत. वास्तविक पाहता लॅन्सेट जर्नल प्रसिद्ध करणाऱ्या ‘एल्सविर’ या कंपनीचा हा पसारा इतका प्रचंड आहे की, ‘एल्सविर’ ही कंपनी आपल्या लहान मोठ्या अशा २५०० नियतकालिकांतून प्रतिवर्षी जगभरातील या सगळ्या क्षेत्रातील माहिती देणारे सुमारे ५० हजारांवर लेख प्रसिद्ध करते. या कंपनीच्या संग्रहालयात २ कोटींच्यावर महत्वाची कागदपत्रे असून ४ लाखांवर इ -बुक्स आहेत. मित्रहो, यावरून तुम्हाला ‘लॅन्सेट’ या नियतकालिकाला प्रसिद्ध करणाऱ्या ‘एल्सविर’ या प्रकाशक कंपनीच्या एकंदरीत महाप्रचंड अशा कारभाराची कल्पना येईल. आपल्या या सगळ्या नियतकालिकांच्या वार्षिक उलाढालीतून या ‘एल्सविर’ कंपनीला २०१८ मध्ये ९५० दशलक्ष पौंडांचा नफा झाला आणि हा नफा या कंपनीच्या एकूण व्यवहाराच्या जवळ जवळ ३८ टक्के टक्के इतका आहे. या ‘एल्सविर’ कंपनीने आपल्या या व्यवसायाची सुरुवात १८८० साली केली आणि शास्त्रीय , वैद्यकीय, तंत्रज्ञान व औषध संशोधन या क्षेत्रांतील आपले पहिले जर्नल म्हणजे नियतकालिक २७ ऑक्टोबर १९४५ मध्ये प्रसिद्ध केले.
लेख व जगभरातील विविध विषयांवरील वार्तापत्रे
बरं इतकंच नव्हे तर, ‘लॅन्सेट’ हे मेडिकल जर्नल सुद्धा आपली स्वतःची वेगळी अशी अनेक वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अशी स्वतंत्र नियतकालिक छापते. यात कॅन्सर, मेंदूंवरील आजार, न्यूरॉलॉजी, वेगवेगळ्या साथीचे रोग, श्वसनाचे विकार, रक्ताचे आजार, मूत्रपिंडांचे आजार, स्त्रिया आणि लहान मुलांचे विविध आजार वगैरे , वगैरे अशा माणसांच्या शरीरातील एक ना अनेक रोगांशी संबंधित असलेली माहिती देणाऱ्या विविध नियतकालिकांचे प्रसारणंही लॅन्सेट करते. एव्हढेच नव्हे तर या शेकडो नियतकालिकातुन जगभरांतील होत असलेल्या अनेक राजकीय आणि सामाजिक घडामोडींवरही वेळोवेळी भाष्य केले जाते व तसेच आपले विचार, परखड मते, आपल्या या नियतकालिकाच्या संपादकीयातूनही वेळोवेळी व्यक्त केली जातात. जगभरातील लॅन्सेटचे असलेले शेकडो प्रतिनिधी, शेकडो वार्ताहर व त्यांनी जागेवर जाऊन लिहिलेली वार्तापत्रे या सगळ्यांच्या माध्यमातून लॅन्सेटमध्ये विविध विषयांवरील वस्तुनिष्ठ लेख,व जगभरातील विविध विषयांवरील वार्तापत्रे छापली जातात.
सामाजिक जाणीव असलेले एक जागृत नियतकालिक :
कोविडच्या या महामारीत लँसेटने वर्ल्ड हेल्थ ऑरगॅनायझेशन च्या कारभारातील त्रुटींवर अनेक वेळेस कठोर टीका केलेली आहे. तसेच सिगारेट व तंबाखूचा समाजातील बेकायदेशीर वापर, होमिओपॅथी औषधांचा वापर, अफगाणिस्थानमधील हॉस्पिटलवर झालेला अमेरिकन विमानाचा बॉम्ब हल्ला, इराक युद्धात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांच्या एकूण संख्येविषयीचे गुप्त अहवाल, तसेच अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यामुळे या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप इराकी नागरिकांची संख्या, इस्राएलच्या हल्ल्यात गाझा पट्टीत मृत पावलेले पॅलेस्टिनी नागरिक, इत्यादी त्यांची अनेक वार्तापत्रे गाजलेली असून या वार्तापत्रातून लॅन्सेटने अनेक विषयांना वाचा फोडलेली आहे व जगाला त्याची दखल घेणे भाग पाडले आहे. आफ्रिकन देशांतील असलेल्या वैद्यकीय त्रुटी,औषधी कंपन्यांची मनमानी व त्यामुळे तेथील लोकांची होणारी फसवणूक, महत्वाच्या व जीवरक्षक औषधांची होणारी तस्करी इत्यादी अनेक सामाजिक विषयांना लॅन्सेटने वाचा फोडलेली आहे. त्यामुळे “लॅन्सेट” हे नुसतेच एक मेडिकल जर्नल नसुन सामाजिक जाणीव असलेले एक जागृत नियतकालिक आहे असे म्हटले तर ते चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्या ४ मे च्या अंकातील भारतातील कोविडच्या वाढत्या परिस्थितीला त्यांनी भारतातील बेजबाबदार परिस्थितीला दोषी धरले आहे. भारतात नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यावर, बंगाल,आसाम राज्यांतील निवडणुकांच्या प्रचंड मोठ्या मिरवणुकांवर, सभांवर त्यांनी आपल्या या लेखातून कठोर टीका केली आहे.व भारतात उद्भवलेल्या या परिस्थितीला पंतप्रधान नरेंद्र मोदी याना जबाबदार धरून या सगळ्यावर टीका करणारा लेख लिहिलेला आहे. भारतातील या सद्यपरिस्थीवर भाष्य करणाऱ्या लॅन्सेटच्या त्या संपादकीयाकडे आणि एकूणच त्या नियतकालिकाकडे आपण एका चिडीने आणि द्वेषाने न बघता सामाजिक जाणीवेपोटी मांडलेल्या या लेखातील एकूण परिस्थितीचे खोलात जाऊन अवलोकन करण्याची गरज आहे असे आपल्याला वाटत नाही काय ..? यात लॅन्सेटवर टीका करून व त्यांना शिव्या घालून तसेच त्या नियतकालिका विषयी अपप्रचार करून ९५० दशलक्ष पौंडांचा वार्षिक नफा कमविणाऱ्या त्या कंपनीचे व लॅन्सेटचे आपण काय वाकडे करू शकणार आहोत? त्यापेक्षा आपले कुठे चुकले याचे आपण आत्मपरिक्षण करणे योग्य ठरणार नाही काय..?
‘लॅन्सेट’ने असे काय वेगळे लिहिले…?
खरं तर, आपल्या देशातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या कोविडच्या या दुसऱ्या लाटेमुळे आपल्या देशांतील नागरिकांवर काय भयानक परिस्थिती ओढवलेली आहे हे आपण सगळे व आपल्यासकट सारे जग, हे या देशांतील दूरदर्शनवरील वेगवेगळ्या भाषेंतील वाहिन्यांवर दररोज तासागणिक दाखविण्यात येत असलेल्या बातम्यातून, त्यात दाखविल्या जाणाऱ्या मृतांच्या आकडेवारीतून, ऑक्सिजन अभावी तडफडणाऱ्या रुग्णाच्या त्या भयानक चित्रणातून, अपुऱ्या बेड्स अभावी हॉस्पिटल्सबाहेर हातात ऑक्सिजनची सिलिंडर्स घेऊन रांगा लावून बसलेल्या रुग्णाच्या त्या, मनाला अस्वस्थ करणाऱ्या, चित्रफिती मधून पाहतोच आहोत. तसेच या विषयांवरील अनेक तज्ञ मंडळींच्या चर्चेतून संपूर्ण देशातील जनता संपूर्ण देशांतील या वस्तुस्थितीचा प्रत्येक दिवशी आढावाही घेत आहे. मग या लॅन्सेटने आपल्या संपादकीयात असे काय वेगळे लिहिले …? या वस्तुस्थितीला जोडून या लेखात भारताच्या पंतप्रधानांवर टीका असल्यामुळे या देशातील पंतप्रधान मोदींवर प्रेम करणाऱ्या मंडळींना या लॅन्सेटचा वट्यातील त्या लेखाचा प्रचंड राग आला हे खरे. पण त्यामुळे लॅन्सेटने केलेली टीका खोटी तर ठरत नाही. त्या टीकेकडे, आपण सकारत्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे असं मला वाटत. लॅन्सेटने या लेखातून आपल्या निदर्शनास आणलेल्या आपल्याकडील वैद्यकीय क्षेत्रातील, सेवेतील ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला या पुढील काळात तातडीची पावले उचलण्याची आणि प्रयत्नशील राहण्याची गरज आहे असं वाटत नाही काय? ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, रुग्णांकरिता बेड्स उपलब्ध नाहीत, डॉक्टर्स व नर्सेस यांचाही तुटवडा.या महामारीमुळे लोकांना आपले प्राण तडफडून ऑक्सिजनभावी गमवावे लागत आहेत हे काय खोटं आहे का ..? आज जगभरातून आपल्याकडे ऑक्सिजनच्या मदतीचा ओघ सुरु आहे. अगदी ग्रीससारख्या आर्थिदृष्ट्या मोडकळीस आलेल्या देशानेही आपल्याला ऑक्सिजन पाठविला हे काय २१ व्या शतकात स्वतःला सुपर पॉवर म्हणवणाऱ्या आपल्या सारख्या देशाला भूषणावह वाटते काय.? परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय हे बघून सरतेशेवटी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला व तसेच राज्य राज्यातील उच्च न्यायालयाना देखील या परिस्थितीत लक्ष घालून केंद्र सरकारला व राज्य सरकारांना निर्देश द्यावे लागलेच ना..?
त्यामुळे जगभर लक्षावधी सदस्य असलेल्या, अब्जावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या, जगाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या आणि वर्षानुवर्षे आपली विश्वासार्हता टिकवून असणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रातील या लोकप्रिय अशा मेडिकल जर्नल ‘लॅन्सेट’वर आगपाखड करत टीका करणे म्हणजे केवळ हास्यास्पद आहे असे मला वाटते. कोंबडं लपवलं तरीही दिवस उजाडायचा थांबत नाही. त्यामुळे लॅन्सेट या नियतकालिकातील त्या लेखाला गंभीरपणे घेत परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्याचा प्रयत्न करणे व भविष्यात आरोग्य सेवेकडे अधिकाधिक लक्ष देत स्वावलंबी बनण्याच्या दिशेने जाण्याचे प्रयत्न करणेच अधिक उचित ठरेल, अधिक योग्य ठरेल, असे मला वाटते.




