अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड अशक्य?
मुंबई : मार्च महिन्यातील 1 तारखेला होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता धुसर आहे. राज्यात वाढलेला कोरोना संसर्ग तसेच मंत्री आणि आमदार यांना कोरोनाची झालेली लागण यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चला होणार आहे. या अधिवेशनात विधानसेच्या अध्यक्षांची निवड होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावेळी अनेक मंत्री आणि अमदार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते अधिवेशनाला हजर राहू शकत नाहीत. त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे या कारणामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लांबवणीवर पडू शकते. तशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या राज्यातील बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील अनेक मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळातील अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू या नेत्यांचा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे हे नुकतेच कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निडणूक होणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, असे असले तीर आगामी पावसाळी अधिवेशनात नव्या अध्यक्षांचनी निवड केली जाऊ शकते, तसा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.