नवी दिल्ली: देशाच्या राजकारणात दोन शब्दांची एकमेकांसोबत टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नाही, असे विधान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केले होते. यानंतर विविध स्तरांतून राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच योगगुरू बाबा रामदेव यांनी राहुल गांधी यांच्या विधानाची खिल्ली उडवत, एवढे तरी वाचायला हवे होते, असा टोला लगावला आहे.
हिंदू ही संस्कृती आहे आणि संस्कृतीची जाण हिंदुत्व आहे. सनातनचा अर्थ अनादी काळापासून चालत आलेला आहे. या देशात राहणाऱ्या सर्व लोकांनी एका प्रवाहात चालायला पाहिजे, असे बाबा रामदेव म्हणाले. हा अक्षरसमज आहे. संस्कृती आणि भारतीयत्वाचे आकलन हा खूप मोठा विषय आहे. हा फक्त राजकीय प्रपोगंडा आहे, अशी टीका बाबा रामदेव यांनी केली.
व्यक्ती आणि व्यक्तिमत्व एकच आहे. आता तुम्ही म्हणाल की व्यक्ती वेगळी आणि व्यक्तिमत्व वेगवेगळे आहे. इतके तरी वाचायला हवे. एवढे बावळट असून चालत नाही, असा टोला बाबा रामदेव यांनी राहुल गांधींना लगावला. ते एका वृत्तसंस्थेशी बोलत होते.
हिंदू आणि हिंदुत्ववादी या दोन्ही गोष्टी वेगळ्या असून, हा देश देश हिंदूंचा होता, हिंदुत्ववाद्यांचा नाही. हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरक हा आहे की हिंदू सत्याचा शोध घेतो, त्याला सत्याग्रह म्हणतात. तर, हिंदुत्ववादी सत्ता शोधतात आणि त्याला सत्ताग्रह म्हणतात. देशात २०१४ पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदू सत्तेबाहेर आहेत. या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून हटवून हिंदूंना सत्तेवर आणायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.