स्पोर्ट्स

कुस्तीपटू सुशील कुमारचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नवी दिल्ली: हत्येच्या आरोपामुळे दिल्ली पोलिस शोध घेत असलेल्या सुशील कुमार या ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीपटूच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्ये प्रकरणी दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने मंगळवारी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला. यामुळे सुशीलचे या प्रकरणातून वाचण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत.

सागर धनखड यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कालच सुशीलवर १ लाख तर त्याचा सहाय्यक अजय याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. रोहिणी येथील न्यायालयात सुनावणी दरम्यान, सुशीलच्या वकिलांनी सांगितले की, या प्रकरणाचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. सिद्धार्थ लुथरा आणि आरएस जाखड यांनी सुशिलच्या वतीने बाजू मांडली. मी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे. पद्मश्रीसह अनेक प्रतिष्ठेची पदक आणि सन्मान मिळाले आहेत. ऑलिंपिकमध्ये दोन वेळा पदक जिंकले आहे. मला छत्रसाल स्टेडियममध्ये माझी कर्तव्य पार पाडण्यासाठी घर मिळाले आहे आणि तेथे मी कुटुंबासह राहतो, असे सुशिलच्या वतीने त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

छत्रसाल स्टेडियममध्ये पाच मे रोजी युवा कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली होती. या हत्येत सुशीलसह त्याचा सहाय्यक अजय याची मुख्य भूमिका होती. मॉडल टाउन पोलिस स्टेशन परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये एक फ्लॅट रिकामे करण्यावरून दोन गटात राडा झाला. या घटनेत पाच कुस्तीपटू गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला. पोलिसांच्या चौकशीत सुशीलचे गॅगस्टर काला जठेडी आणि विश्नोई यांचे संबंध असल्याचे समोर आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button