‘आयपीएल’च्या ब्रॉडकास्टींग युनिटमधील १४ सदस्यांना कोरोना

मुंबई : नितीश राणा, अक्षर पटेल यांच्यानंतर वानखेडेवरील ८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे सर्वांची चिंता वाढली होतीच. त्यात आयपीएलच्या ब्रॉडकास्टींग युनिट ( थेट प्रक्षेपणासाठी कर्मचारी) मधील १४ सदस्यांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईच्या फोर सिजन हॉटेलमध्ये ब्रॉडकास्ट क्रूची राहण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांमध्ये कॅमेरामन, प्रोड्यूसर, डायरेक्टर, EVS ऑपरेटर आणि व्हिडीओ एडिटर यांचा समावेश आहे.
या संदर्भात स्टार स्पोर्ट्सचे प्रमुख संजोग गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यांनी BCCIशी चर्चा करण्याचा सल्ला दिला. बीसीसीआयनं प्रत्येक ग्रुपसाठी वेगवेगळे बायो-बबल तयार केले आहेत. बीसीसीआयच्या प्रतिनिधीने सांगितले की, ‘ब्रॉडकास्ट क्रूची स्टारला चिंता आहे. जर मैदानावरील कर्मचारी व आयोजन समितीचे सदस्य कोरोनाग्रस्त होऊ शकतात, तर स्टार क्रूही होऊ शकतोच. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहोत.’
देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी जवळपास ५० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्य सरकारनं ५ ते ३० एप्रिल या कालावधीत कडक निर्बंध लावली आहेत आणि शनिवार-रविवार लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील आयपीएलचे सामने ( IPL 2021) ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, हेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी आयपीएल संबंधित फ्रँचायझी अन् ब्रॉडकास्टर युनिटमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे BCCI ची चिंता वाढली आहे.