सर्वच पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे केंद्र सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढेल : संजय राऊत

मुंबई : मराठा आरक्षणाचा चेंडू शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने त्यावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हे सर्व शांतपणे आणि सुरळीत पार पडेल आणि केंद्र सरकार या प्रश्नावर नक्कीच तोडगा काढेल अशी आम्हाला खात्री आहे, असंही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. कोल्हापूर ही सामाजिक परिवर्तनाची क्रांती भूमी आहे. कोल्हापुरातून मराठा आरक्षणासंदर्भात जी आंदोलनाची सुरुवात झाली, त्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या सर्वच घटकांची सहानुभूती आणि पाठिंबा आहे. या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना साकडे घातले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांना आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची प्रमुख भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
यावेळी राऊत यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. मला चावी दिली जाते असं दानवे म्हणत आहे. खरंतर चावी द्यावीच लागते. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अनेकजण चावी देत असतात. सल्ले देत असतात. त्यामुळेच सरकार चालतं. चावी देणं म्हणत असाल तर चावी फार महत्त्वाची आहे. दीड वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती. त्यामुळे तुमच्या सत्तेला टाळं लागलं आणि आमच्या सत्तेचं टाळं उघडलं. चावी आणि टाळं फार महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडे चावी असते ते कुणालाही टाळं लावू शकतात. आमच्याकडे चावी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही उघडू, असं ते म्हणाले. दानवे मित्रं आहेत. उत्तम विनोद करतात. चांगलं ग्रामीण नेतृत्व आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.