राजकारण

सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का?; जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

मुंबई : सत्ता आल्याशिवाय मी महाराष्ट्रासाठी काहीच करणार नाही, मला सत्ता मिळाली की मी सर्वकाही करेन, सत्ता मिळेपर्यंत महाराष्ट्रातील जनतेसाठी काहीही करणार नाही ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आम्हाला सत्ता द्या ओबीसी समाजाचे आरक्षण तीन महिन्यात देतो असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का? असा सवाल करतानाच सत्ता आली किंवा खुर्ची मिळाली तरच काम करणार नाहीतर नाही असा जो फडणवीस यांचा हट्ट आहे हे योग्य नाही. असे वक्तव्य महाराष्ट्रातील कुठल्याच नेत्यांनी केलेले नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजपला सत्तेत येण्याची गरज नाही कारण राज्यातील जनतेने त्यांना नकार दिला आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला. ओबीसी समाजाबद्दल भाजपला आज जो कळवळा निर्माण झाला आहे. मात्र यांच्यामुळे भुजबळसाहेबांना तुरुंगात खितपत पडून राहावे लागले. एकनाथ खडसेंसारखे ओबीसी नेते पक्षातून बाहेर काढले गेले. एकंदरीत भाजपमध्ये ओबीसी नेता राहणार नाही असा प्रयत्न भाजपकडून झाला. ओबीसी समाजाची चळवळच संपवण्याचं काम करण्यात आल्याचा गंभीर आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.

छगन भुजबळ यांनी भाजपकडे तोडगा काढण्याची विनंती केली आहे. पण फडणवीस काय म्हणतात मला सत्ता द्या, तीन महिन्यात प्रश्न सोडवतो. म्हणजे सत्ता दिल्याशिवाय महाराष्ट्रासाठी तुम्ही काहीच करणार नाही का?, असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button