
मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दुकानांपासून ते मॉल्सपर्यंत सर्वच सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता सण उत्सवांवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. गणेशोत्सव पुढील महिन्यात आहे, पण त्याआधी दहीहंडी उत्सव असून त्यावर निर्बंध कायम ठेवण्याचा सरकार विचार करत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव लक्षात घेता सुरक्षेच्या कारणास्तव यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करणार की नाही याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांसोबत होणाऱ्या बैठकीत होणार आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत मुंबईतील प्रमुख गोविंदा पथकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गोविंदांना थरावर थर लावत हंडी फोडता येणार की नाही, याबद्दल आजच्या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या ३१ ऑगस्टला दहीहंडी उत्सव आहे. गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव सुरूच आहे. त्यातच आता संभाव्य तिसरी लाट येणार असल्यामुळे उत्सवांवर देखिल सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध घालण्यात आलेत. मात्र, विरोधी पक्ष भाजप आणि मनसेने मुंबई आणि ठाणे शहरात दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचं जाहीर केले आहे.