राजकारण

नारायण राणे, प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार?

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह हे कोकणात आले होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना, मराठा चेहऱ्याच्या निमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मात्र राजकीय विश्लेषकांना या दाव्यामध्ये तथ्य वाटत नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित आहे. मोदींच्या मंत्रिमंडळाचा कोटा हा जवळपास ८०खात्यांचा आहे. मात्र सध्या ६० मंत्री स्वत:सह अन्य खात्यांचा भार वाहत आहेत.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. मोदी कॅबिनेटमध्ये काही मंत्रिपदांची आदलाबदली, तर काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यातच महाराष्ट्रातील एका भाजप नेत्यांचं केंद्रीय मंत्रिपद धोक्यात असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे त्यांना हटवून नारायण राणेंसारखा आक्रमक चेहरा दिला जाऊ शकतो. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा शिवसेनेला थेट अंगावर घेण्याचा मुद्दा असो, सध्या भाजपकडे नारायण राणे यांच्यासारखा दुसरा नेता नाही. त्यामुळे ठाकरे सरकारला थेट चॅलेंज देऊन, कोकणात भाजप वाढविण्यासाठी नारायण राणे यांची मदत होऊ शकते, असा अंदाज आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत हे मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रालयाचं खातं सांभाळत होते. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची युती तुटली, त्यामुळे अरविंद सावंत यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी केंद्रातील मंत्रिपद सोडलं. तेव्हापासून त्या मंत्रिपदाचा भार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याचं ते मंत्रिपदही रिक्त आहे. या खातं महाराष्ट्राच्या वाट्याला द्यायचं झाल्यास तिथे राणेंचा नंबर लागतो का हे पाहावं लागेल.

प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा

नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचं नाव चर्चेत येत ना येतं तोच प्रीतम मुंडे यांचंही नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आलं आहे. जर येत्या कॅबिनेट विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर, गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबात दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपद जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button