मुंबई: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली. पण युतीची चर्चा झाली नसल्याचं पाटील यांनी सांगितलं. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी आमची अचानक भेट झाली होती. त्यावेळीच मुंबईत भेटायचं ठरलं होतं, असं पाटील यांनी सांगितलं.
‘राज यांच्यासोबत राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्याचे नेते म्हणून तुम्ही मोठ्या भूमिकेत यायला हवं असं मी त्यांना सांगितलं. यावेळी युतीबद्दल चर्चा झाली नाही. तसा कोणताही प्रस्ताव नाही. राज यांच्या मनात परप्रांतियांच्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न मी केला. एकत्र येण्याचा प्रस्ताव नाही. त्यासाठी वेळ यावी लागते,’ असं सूचक विधान पाटील यांनी केलं.
‘राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेबद्दल माझ्या मनात काही प्रश्न होते. ते मी नाशिकच्या भेटीत बोलून दाखवले. त्यानंतर राज यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या भाषणाची एक क्लिप मी पाहिली. ती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये व्हायरल झाली होती. त्यातून माझ्या काही शंका दूर झाल्या. तर इतर काही शंकांबद्दल आज आमची चर्चा झाली,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.
संजय राऊतांना आव्हान
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही भाष्य केलं. “येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत खासदार असलेल्या संजय राऊतांनी मुंबईतील सेफ जागा शोधावी आणि तिथून निवडणूक लढवावी. अमेरिकेची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवायला सज्ज आहोत अशा थाटात राऊत दंड थोपटतात. त्यांनी दंडही चेक करावे आणि त्यांची क्षमताही चेक करावी”, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.
भाजप-मनसे एकत्र येणार असेल तर आनंदच : नांदगावकर
मनसे आणि भाजपा भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं विधान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-भाजपा युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता यावर बाळा नांदगावकरांच्या सूचक विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आज बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल’, असं नांदगावकर म्हणाले.
नांदगावकर पुढे म्हणाले की, काहीवेळा राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करायच्या असतात. त्यासाठी काही ठोकताळे असतात, त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. शरद पवारांनीही ठोकताळ्याचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन केलं. आजचाही हा ठोकताळाच आहे, असंही ते म्हणाले.