…तर अजित पवारांचा राजीनामा घेणार का?; आशिष शेलारांचा मलिक यांना सवाल

मुंबई: पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली होती. त्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बंगालची जबाबदारी घेऊन शहांचा राजीनामा मागणाऱ्या मलिक हे पंढरपूरची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लसीच्या मुद्द्यावर ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये, असं सांगतानाच तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का? या पराभवाची जबाबदारी स्वीकारून स्वत: मलिक राजीनामा देणार का? असा सवाल शेलार यांनी केला.
भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही ममता दीदींना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे. जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्तींबद्दल बोलले असतील तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट झाली, असं सांगतानाच पंढरपूरात मग काय झाले? यालाच स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असं म्हणतात, असा चिमटा त्यांनी काढला. जे स्वतः कुबड्यांवर आहेत. ज्यांचं पाहिलं पाऊल कुबड्यां शिवाय पडत नाही. त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
नाना पटोलेंचं आयुष्य कालाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाहीत. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. माहितीविना बोलणं म्हणजे कालाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परिषद अशीच असते, अशी टीका त्यांनी केली.
अदर पूनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नाव पुढे येत आहेत. पूनावाला यांना आताच सुरक्षा का मागावी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपलं कामं चोख केलय. सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. आज यावर राजकारण करायचं नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपाची भूमिका आहे, असं ते म्हणाले. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील. त्यांना उघड करण्याचं काम भाजपा करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं, असा इशाराही त्यांनी दिला.