
एकंदरच एकीकडे महिलांच्या यशाचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या यशामागे त्यांची अनैतिकता हेच कारण पुढे करुन त्यांची बदनामीही करायची असाच हा सारा मामला. मुळातच एखादी महिला विवाहबाह्य संबधात असते तेव्हा ९० टक्के ती कोणा एका विवाहित पुरुषासोबतच अनैतिक संबंधात असते हे वास्तव या सर्व्हेतून का दुर्लक्षित केलं जातंय?
महिलांप्रती आजही सन्मान या शब्दाचा प्रयोग कृतीतून उमटत नाही, ही शोकांतिका आहे. पुरुषप्रधान मानसिकतेचा हा पगडा 21 व्या शतकातही कायम आहे. म्हणूनच तर दरवर्षी बिनचूकपणे जागतिक महिला दिनाच्या पूर्व संध्येला महिलांना अधिकाधिक बदनाम करणारे सर्व्हे विविध माध्यमांतून प्रसिद्ध होतात. 2021 हे वर्षही या मानसिकतेला अपवाद नाही. यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात दोन तीन विविध विषयांवरचे महिलांना टारगेट करणारे सर्व्हे जाहीर करण्यात आले.
एका सर्व्हेत भारतीय कंपन्यांतील ३९ टक्के वरिष्ठ पातळीवरील मुख्य कार्यकारी पदांवर (सीईओ) महिला विराजमान असल्याचे ग्रँट थॉर्नटन या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. कॉर्पोरेट जगतात नेतृत्वस्थानी महिला असण्याच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागला असून, पहिल्या स्थानावर फिलिपिन्स, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. तर आणखी एका सर्व्हेनुसार, ग्लिडेन ह्या डेटिंग पोर्टलनं भारतीय महिलांचा सर्वे केला. त्यांच्या निरिक्षणानुसार विवाहबाह्य संबंधात असलेल्या 48 टक्के महिला आई आहेत. अशा संबंधात असलेल्या 78 टक्के महिला ह्या उच्च शिक्षित तर आहेतच पण 74 टक्के महिला ह्या नोकरी व्यवसायात उच्चपदस्थही आहेत. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा वेगानं बदलताना दिसत आहेत. ग्लिडेन हे महिलांनीच एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर्ससाठी डिझाईन केलेलं पोर्टल असून त्याचा युजरबेस हा 10 लाख आहे. त्यामुळेच सर्वेतली निरिक्षणं महत्वाची आहेत.
एकंदरच एकीकडे महिलांच्या यशाचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे त्यांच्या यशामागे त्यांची अनैतिकता हेच कारण पुढे करुन त्यांची बदनामीही करायची असाच हा सारा मामला. मुळातच एखादी महिला विवाहबाह्य संबधात असते तेव्हा 90 टक्के ती कोणा एका विवाहीत पुरुषासोबतच अनैतिक संबंधात असते हे वास्तव या सर्व्हेतून का दुर्लक्षित केलं जातंय? हा सर्व्हे 78 टक्के विवाहित पुरुष विवाहबाह्य संबंधात अशा अर्थाने का स्वीकारला जात नाही? याचाच अर्थ पुरुषाने एकापेक्षा अनेकींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरी त्याचे कौतुकच होणार आणि महिला आपल्या अपेक्षांप्रति मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या तरी त्याचा बोभाटा होणार!
आज असे कोणतं क्षेत्र आहे, जिथे कार्यरत असणारे स्त्री-पुरुष ठामपणाने सांगू शकतात की आमच्या क्षेत्रात असे कोणाचेच कोणाशीच अनैतिक प्रेमसंबंध नाहीत. राजकारणातील अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांनी माध्यमांना खाद्यच पुरवले आहे, मग ते पूजा चव्हाण असो वा रेणू शर्मा. अनेक मराठी, हिंदी अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांशी मैत्री करावीच लागते किंबहूना ती केल्यानंतरच काम मिळते असा अनुभव आहे. तर अनेक क्षेत्रात पदोन्नती असो वा नोकरीतल्या सवलती असोत वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. जेव्हा एखादी महिला अशाप्रकारच्या तडजेडींना तयार होते तेव्हा ही तडजोड करायला भाग पाडणाऱ्या पुरुषासाठी ती पहिलीच महिला नसते. अशा शोषित पुरुष वर्गासाठी असा एखादा सवर्हे केला आणि त्यांना खरे बोलायला भाग पडले तर कदाचित एकाचवेळी एक पुरुष अनेकींसोबत विवाहबाहय संबधात असल्याचे जळजळीत वास्तव समोर येईल. सर्व्हे करणाऱ्यांना नेमकी हीच गोष्ट नकोशी असते, बाईची बदनामी करणे आणि टीआरपी वाढवणे असे सवंग माध्यमांचे निकष रुढ होताना दिसत आहेत, ते याच पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे!
जागतिक महिला दिनी वर्षभर साठवून ठेवलेल्या महिलांविषयक स्टोरींना भरभरुन प्रसिद्धी द्यायची, सत्कार सोहळ्यांचे आयोजन करायचे आणि पुन्हा वर्षभर महिलांचे शोषण विविध मार्गाने करायला हे ‘सो कॉल्ड’ पुरोगामी बुरखे मोकळेच…! महिलांनाही या खोट्या मुखवट्यांचा साज होणे हल्ली स्पर्धेचे वाटू लागले आहे, या स्पर्धेत आपण आपल्यासारख्याच एखाद्या महिलेचा बळी देतो आहोत, याचेही भान कोणालाही राहिले नाही. त्यामुळे कायदा काय अन संधी काय सगळं काही बरोबरीने मिळू लागलं तरी पुरुषप्रधान मानसिकतेच्या गुलाम बनून राहण्यात जोवर बाईला धन्यता वाटत राहील तोवर तरी सामाजिक व्यवस्था बदलणार नाही. या बदलत्या निर्जीव मानसिकतेमुळे ज्या खऱ्याच कर्तबगार महिला आहेत त्यांच्या कर्तबगारीलाही गालबोट लागते आहे, त्यांच्या हूशारीकडे दुर्लक्ष केले जात आहे, हेही सत्यच.
बाईचे दुय्यमत्व असेच राहणार.. शोषित, वंचित.. बदनामीला सामोरे जाणारे.. कर्तृत्व असूनही दबून जाणारे… याला अपवाद असतीलही पण अत्यंत तोकडे… बाईपणाच्या सन्मानाची ज्योत तेवली पाहिजे… गर्भातल्या कळया उमलल्या पाहिजेत… बाई तिच्या प्रत्येक नात्यात सुरक्षित आणि सन्मानित राहिली पाहिजे यासाठी वसा लुटला पाहिजे… सन्मान सोहळे बाजूला सारुन कृतीची जोड मिळाली पाहिजे…. कोणीतरी गोड बोलतो, आपल्यावर पैसे उधळतो म्हणून आपण आपल्या जिवाची राख रांगोळी करायची का, याचा विचार सर्व जाती धर्मातल्या तरुणींनी करायलाच हवा. आता उथळता बस्स झाली…! आ त्मसन्मानासाठी लढूया…! चला सख्यांनो नव्या उमेदीने स्वतःसाठी जगूया… आपल्या घरात, नात्यात, आसपास असणाऱ्या समस्त महिलांचा सन्मान राखण्यासाठी जे जे करता येईल ते करुया… महिला दिनाच्या एकाच दिवसाच्या नाही तर 365 दिवसांच्या शुभेच्छा…!