रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचे फडणवीसांनी वकीलपत्र घेतले काय?; नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई : रेमडेसिवीरची साठेबाजी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील संपूर्ण भाजप का घाबरली? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यामुळे त्यांनी या कंपनीच्या मालकाचे वकीलपत्र घेतले होते की त्यांचे लागेबांधे होते म्हणून त्यांची बाजू घेत होते, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिले आहे.
ब्रुक्स कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी साठेबाजी केली म्हणून ताब्यात घेतले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारला होता. विरोधी पक्षनेत्यांच्या या कृतीचा नवाब मलिक यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. देशात आणि राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झालेला असताना केंद्राने या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्राने केवळ ७ कंपन्यांना देशांतर्गत वितरण आणि विक्रीची परवानगी दिली आहे. दोन कंपन्यांना परदेशात वितरण आणि विक्रीची परवानगी दिली आहे. तसेच १७ कंपन्यांना उत्पादन करण्याची परवानगी दिली आहे. त्या शिवाय या सातही कंपन्यांना उत्पादनाची परवानगी देण्यात आली आहे. निर्यातबंदी असतानाही काही कंपन्यांकडे साठा उपलब्ध आहे. या साठ्याची विक्री करण्याची परवानगी द्या अशी मागणी काही कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली होती. ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक हे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना भेटले होते. आमच्याकडे साठा असून परवानगी दिली तर तो तुम्हाला देऊ असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना परवानगीही देण्यात आली होती. मात्र, त्याआधी पोलिसांना काही निर्यातदार कंपन्यांकडे साठा असल्याचं पोलिसांना कळलं होतं. त्यामुळे ब्रुक्स फार्माच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, असं मलिक म्हणाले.
राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि स्थानिक आमदार पराग अळवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांना काही माहिती मिळाली तर ते चौकशीसाठी बोलावत असतात. काळाबाजार रोखणं हे पोलिसांचं काम आहे. पण ब्रुक्स कंपनीच्या या मालकासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते थेट पोलीस ठाण्यात गेले. एखादी काही घटना घडली तर विरोधी पक्षनेते फोनवरून माहिती घेत असतात. पोलिसांशी चर्चा करत असतात. पण प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जात नाहीत. मात्र फडणवीस, दरेकर गेले. डोकानियाला पोलिसांनी चौकशीला बोलावलं म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीस पेशाने वकील आहेत. ते डोकानियांची वकीलपत्रं घेऊन बाजू मांडत होते की त्यांच्याशी संबंध आहेत म्हणून बाजू मांडत होते?. विरोधी पक्षनेत्यांचा डोकानियाशी संबंध काय? असा सवाल मलिक यांनी केला.
हेच विरोधी पक्षनेते डोकानियाला भेटायला दीव दमणलाही गेले होते. म्हणजे महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा साठा मिळू नये म्हणून भाजपचे लोक प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिक काहीही बोलत नाही. या लोकांकडे साठा होता. तुम्हीच ट्विट करून सांगितलं होतं. सरकारने रेमडेसिवीर मागितल्यावर सरकारला हे लोक पुरवठा करत नाहीत आणि विरोधी पक्षाला द्यायला तयार होतात, यामागचे राजकारण काय? असा सवाल करतानाच दोन्ही विरोधी पक्षनेते पुरवठादाराची वकिली करण्यासाठी जातात हे योग्य नाही. कोणीही कितीही मोठा असेल आणि काळाबाजार करत असेल तर कारवाई होईल. मग कुणी कुणाची कितीही वकिली केली तरी पोलीस नियमानुसार कारवाई करणारच, असंही ते म्हणाले.