Top Newsराजकारण

मजुरांना महाराष्ट्राबाहेर कोणी पाठवले?, गोयल, फडणवीसांचे ट्विट दाखवत भाजपचा पर्दाफाश

नवी दिल्ली : काँग्रेसने कोरोनाच्या काळात मुंबईत यूपी आणि बिहारींना पैसे देऊन घरी जायला सांगितलं. तुमच्या राज्यात जाऊन कोरोना पसरवा असं काँग्रेसने सांगितलं, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. युपी, बिहारींना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकारनेच ट्रेन सुरू केल्या होत्या. आम्ही केवळ त्यांच्या तिकीटाचे पैसे दिले, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. तसेच ट्रेन सुरू करण्यात येत असल्याचे तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले पाच ट्विट आणि ट्रेन सुरू केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांचे आभार मानणारे केलेलं ट्विटही सुप्रिया सुळे यांनी दाखवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला सुपरस्प्रेडर संबोधत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच तुम्ही राज्या राज्यांत भांडणे का लावत आहात? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका केली. काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दीड तासांचं भाषण होतं. खूप अपेक्षने मी या भाषणाकडे पाहत होते. सध्या आपला देश अडचणीतून चालला आहे. त्यामुळे राज्यांनी पुढे कसं मार्गक्रमण करावं याबाबत पंतप्रधानांनी दिशा द्यावी असं वाटत होतं. आपण जीएसटीच्या एका टप्प्यावर आहोत, कोरोनाची तिसरी लाट ओसरते आहे. नव्या नोकऱ्या निर्माण होत नाही. त्यामुळे एक स्टेट्समन म्हणून, पंतप्रधान म्हणून ते काही मार्गदर्शन करतील असं वाटत होतं. पण ते महाराष्ट्राबद्दल जे बोलले ती वेदनादायी गोष्ट आहे. मोदींच्या या विधानाने मला प्रचंड वेदना झाल्या. आपल्या महाराष्ट्राबद्दल मोदी असं का बोलत आहेत. आपल्या राज्याने भाजपला १८ खासदार दिले. मोदी पंतप्रधान आहेत त्यात महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्यांनी या मतदारांचा अपमान केला. कोविड स्प्रेडर म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला. ते केवळ भाजपचे पंतप्रधान नाहीत. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी असं विधान केलं. त्यामुळे दु:ख झालं. पंतप्रधानपद हे केवळ एखाद्या पक्षाचं पद नाही. ती संवैधानिक पोस्ट आहे. ते देशाचे आहेत. त्यामुळे त्यांचं विधान अधिक दु:खदायक होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ट्रेन केंद्र चालवतं, राज्य नाही

यावेळी त्यांनी केंद्रानेच मजुरांसाठी रेल्वे सुरू केल्याचं सांगितलं. बुकिंग इन श्रमिक स्पेशल ट्रेनचा आढावा केंद्र सरकारनेच घेतला होता. गुजरात राज्यातून १ हजार ३३ आणि महाराट्रातून ४१७ ट्रेन चालवल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. ट्रेन महाराष्ट्र सरकार चालवत नाही. केंद्र चालवतं. कोणती ट्रेन कधी जाणार हे केंद्र सरकार ठरवतं. आमच्याकडे ट्रेन नाही तर लोकांना कसं पाठवणार? आम्ही बस देऊ शकतो, ट्रक देऊ शकतो. पण ट्रेन देऊ शकत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेलं विधान दुर्देवी आहे, असं त्यांनी सांगितलं.

गोयल यांचे पाच ट्विट

मी कोणत्याही राज्याचा प्रचार करत नाही. सर्व राज्यांबद्दल मला आदर आहे. कोरोना काळात मजुरांना दिलासा दिल्याबद्दल पीयूष गोयल यांचे मी अनेकदा आभार मानले आहेत. ते रेल्वेमंत्री असताना मी त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्याकाळात ट्रेन सुरू करण्याबाबत त्यांनी ट्विट केले होते. उद्धवजी, प्रकृतीची काळजी घ्या. आम्ही श्रमिक सोशल ट्रेन सुरू करणार आहोत. किती लोकांना पाठवायचं आहे याचा डेटा तुमच्याकडे आहे का? असं गोयल म्हणाले होते. तसं ट्विट त्यांनी केलं होतं. गोयल महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्राला किती ट्रेन हव्यात हे त्यांनीच विचारलं होतं. २४ मे रोजी त्यांनी पाच ट्विट केले होते. त्यात त्यांनी ट्रेन सुरू करण्यावर भाष्य केलं होतं, असं त्या म्हणाल्या.

गोयलांचं ट्विट अन् फडणवीसांचे आभार

पीयूष गोयल यांनी रेल्वे सुरू करत असल्याचं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी रिट्विट करत त्यांचे आभार मानले होते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांचं खूप खूप आभार. त्यांनी लगेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईहून लवकरच दहा गाड्या रवाना होतील, असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस आणि गोयल हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनीच हे विधान केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचे खासदार हरिश द्विवेदी यांनीही गेल्या आठवड्यात संसदेत ट्रेन सुरू करण्याचं श्रेय भाजपचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोना काळता मजुरांना आम्ही त्यांच्या राज्यात पाठवत होतो हे कसं म्हणता? असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button