Top Newsराजकारण

काँग्रेसवर तोफ डागताना पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचे तोंडभरुन कौतुक

नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यसभेत काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना १०० वेळा लोकनियुक्त सरकारं बरखास्त करण्यात आली. मग काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडानं संघराज्याची भाषा करतात, असा थेट सवाल मोदींनी उपस्थित केला. दरम्यान, काँग्रेसवर टीका करणाऱ्या मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं कौतुक केलं. मला शरद पवारांचे आभार मानायचे आहेत. हा निर्णय यूपीएचा नाही म्हणत मी जास्तीत जास्त लोकांशी बोलेन असं त्यांनी मला सांगितलं. शरद पवार, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठकीला हजेरी लावली. संपूर्ण मानव जातीवर संकट आलं असताना तुम्ही बैठकीवर बहिष्कार टाकलात. शरद पवारांकडून काहीतरी शिका, अशा शब्दांत पवारांचं कौतुक करताना मोदींनी काँग्रेसला सुनावलं.

काँग्रेसनं कोरोना काळातही राजकारण केलं. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून सातत्यानं बैठका घेतल्या जात होत्या. मी अनेकदा देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्याकडे पाठ फिरवली, अशा शब्दांत मोदी काँग्रेसवर बरसले. सार्वजनिक जीवनात चढ उतार येत असतात. जय-पराजय होत असतात. त्यातून जी व्यक्तिगत निराशा निर्माण होते ती देशावर थोपवू नये. सत्तेत बसलो म्हणून देशाची चिंता करायची आणि विरोधी बाकावर बसलो म्हणजे देशाची चिंता करायची नाही असं असतं का? कोणाकडून शिकता येत नसेल तर पवारांकडून शिका. या वयातही पवार अनेक आजारांशी सामना करत असूनही आपल्या मतदारसंघातील लोकांना प्रेरणा देत असतात. आपल्याला नाराज होण्याची गरज नाही. तुम्ही नाराज होत असाल तर तुमचे जे मतदारसंघ आहेत तिथले लोकही उदास होतील, असा हल्लाही त्यांनी चढवला.

…तर गोवा स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता, नेहरूंवर निशाणा

गोव्यामध्ये पुढील आठवड्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. केवळ ४० आमदारसंख्या असलेल्या या छोट्याशा राज्यात विजय मिळवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांसह अनेक छोटे मोठे पक्ष आणि आघाड्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, मोदी यांनी राज्यसभेत बोलताना गोव्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला.

मोदी गोव्याचा उल्लेख करत काँग्रेसला घेतले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती आखली गेली असती तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे गोवा गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकून पडला नसता. गोव्याच्या स्वातंत्र्यापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या प्रतिमेची चिंता होती. त्यामुळे जेव्हा गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत होता, तेव्हाही नेहरू गोव्यात लष्कर पाठवणार नाही, असे सांगत होते. गोव्यावर काँग्रेसने हा अन्याय केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

…आणि मंगेशकरांना काढून टाकलं !

काँग्रेसनं किती अन्याय केलाय यावर निशाणा साधताना मोदींनी राज्यसभेतील भाषणात वेगवेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना त्यांचं वक्तव्य हे काँग्रेसला जोरदार चिमटे काढणारं होतं. आगामी गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी गोवा मुक्तीच्या संग्रामावरुन आणि नेहरुंच्या भूमिकेवर टीका केलीच. शिवाय गोव्याचेच असलेल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या माध्यमातून मोदींनी केलेलं वक्तव्य हे गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहेत. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला, असा थेट आरोप मोदींनी केलाय. गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर केलेली कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक प्रकारचा घाला होता, अशी थेट टीका नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात केली आहे.

लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालाय. पण लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होतं. त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.. हे जाणून घ्या.. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होत, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय..

सावरकरांनी हृदयनाथ यांना सांगितलं होतं की माझी कविता सादर करुन तुला जेलमध्ये जायचंय का… तेव्हा हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेचा चाल देत सादर केलं होतं.. यानंतर दहाच दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं, असा दावा मोदींनी केलाय..

काँग्रेस काळात कशाप्रकारे अन्याय झाला, याची यादी मोठी आहे.. मज्नू सुलतानपुरी यांना पंडित नेहरु यांच्यावर टीका केल्यामुळे एक वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आल. धर्मपालजी यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. किशोर कुमार यांना इंदिराजींच्या समर्थनात न बोलल्यामुळे त्यांनाही काढून टाकण्यात आलं होतं.

लता मंगेशकरांच्या निधनावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावली होती. अशातच आता राज्यसभेत केलेल्या भाषणात गोवा आणि मंगेशकर कुटुंबीय यांचा धागा जोडत काँग्रेसवर निशाणा साधण्याची रणनिती ही एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीचा भाग आहे, असंही मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

काँग्रेस नसती तर…?

दरम्यान, काँग्रेस नसती तर काय झालं असतं, असा सवाल करतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस नसती तर देशाचं काय झालं असतं, येथे वारंवार बोललं गेलं. मात्र महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही झालं नसतं असं सांगत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. पण खरंच काँग्रेस विसर्जित झाली असती तर खूप काही घडलं नसतं. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस नसती तर देशाची लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती. काँग्रेस नसती तर देशात आणीबाणी लागली नसती. काँग्रेस नसती तर शीखांचा नरसंहार झाला नसता. काँग्रेस नसती तर काश्मिरी पंडितांचे पलायन झाले नसते. काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार नसता. काँग्रेस नसती तर जातीयवाद नसता. काँग्रेस नसती तर अधिक विकास झाला असता, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

यावेळी राहुल गांधींनी मांडलेल्या फेडरल स्ट्रक्चरच्या मुद्द्यावरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. सभागृहात सांगण्यात आले की, काँग्रेसने भारताची पायाभरणी केली आणि भाजपाने त्यावर झेंडा लावला. काही लोकांना वाटते की, भारत १९४७ मध्ये निर्माण झाला. याच विचारामुळे अडचणी निर्माण झाल्या. ज्यांना ५० वर्षे काम करण्याची संधी मिळाली, त्यांनी काहीच केलं नाही. १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा आवळणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये. भारतीय लोकशाहीला घराणेशाही असलेल्या पक्षांपासून मोठा धोका आहे. जेव्हा एखाद्या पक्षामध्ये कुटुंब सर्वोच्च होते. तेव्हा त्या पक्षामध्ये सर्वप्रथम टॅलेंटचे नुकसान होते, असा टोला मोदींनी लगावला.

काँग्रेसनं कोणकोणती सरकारं अस्थिर केली?

संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. सरकारं अस्थिर करणं हेच काँग्रेसचं धोरण आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेत असताना १०० वेळा लोकनियुक्त सरकारं बरखास्त करण्यात आली. मग काँग्रेसचे नेते कोणत्या तोंडानं संघराज्याची भाषा करतात, असा थेट सवाल मोदींनी उपस्थित केला. राज्यांमधील ५० सरकारं बरखास्त करण्यात आली, लोकनियुक्त सरकार पाडण्यात आली, तेव्हा देशाचं पंतप्रधान कोण होतं, असा प्रश्न मोदींनी राज्यसभेत विचारला. सरकार अस्थिर करणं हेच त्यांचं धोरण होतं आणि आता त्याचीच शिक्षा त्यांना मिळत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला.

काँग्रेस काळात बरखास्त करण्यात आलेल्या राज्यांची यादीच मोदींनी वाचून दाखवली. केरळमध्ये नंबुद्रीपाद यांचं सरकार बरखास्त केलं गेलं. तामिळनाडूतील करुणानिधींचं सरकार पाडलं. आंध्र प्रदेशमधलं एनटीआर सरकार बरखास्त केलं. कर्नाटकातलं बोम्मई यांचं सरकार पाडलं. विमानतळावर स्वागत व्यवस्थित झालं नाही, म्हणून त्याकाळी मुख्यमंत्री बदलले जात होते, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली.

पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत राहुल गांधी आणि गांधी परिवारावर जोरदार टोलेबाजी केली. काँग्रेसच्या हायकमांडची नीती तीन प्रकारची आहे. एक म्हणजे डिस्क्रेडिट करा. दुसरी डीस्टॅबलाईज्ड करा, तिसरी म्हणजे डिसमिस करा. अविश्वास निर्माण करा, अस्थिर करा आणि नंतर बरखास्त करा हे काँग्रेस हायकमांडचं धोरण राहिलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. फारुख अब्दुलांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी देवीलाल यांचं सरकार कुणी अस्थिर केलं होतं? चौधरी चरणसिंगची सरकार कुणी अस्थिर केलं होतं? पंजाबमध्ये सरदार बादलसिंग यांचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला होता? कर्नाटकात हेगडेंचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? 50 वर्षापूर्वी डाव्यांचं सरकार कुणी पाडलं होतं? एमजीआरचं सरकार कुणी डिसमिस केलं होतं? आंध्रमध्ये एनटीआरचं सरकार कुणी बरखास्त केलं होतं? केंद्र सरकारचं ऐकत नाही म्हणून मुलायम सिंह यादव यांना कोणत्या पक्षाने त्रास दिला होता? अशा सवालांच्या फैरीच त्यांनी झाडल्या. विरोधक नेहमी इतिहास बदलण्याचे आरोप करतात. त्याल्याही त्यांनी उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महारांजाचे नाव येणारच, असे हसत-हसत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत जोरदार भाषण केलं. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाची त्यांचं नाव न घेता चिरफाड केली. गुजरातमध्ये एक गोष्ट बोलली जाते. महाराष्ट्रातही तीच बोलली जात असेल. कदाचित शरद पवारांना माहीत असेल. जेव्हा हिरवळ असते, शेत-शिवार हिरवगार झालेलं असतं आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले तर आयुष्यभर त्याला तो हिरवं चित्रं दिसत असतं. तसंच २०१३ पर्यंत दुर्दशेत दिवस काढले. २०१४ मध्ये जनतेने अचानक प्रकाश निर्माण केला त्यातून कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार, असा हल्लाच मोदींनी राहुल गांधींवर लगावला.

देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नका

सत्ता कुणाचीही असो पण देशाच्या सामर्थ्याला कमी लेखू नये. देशाच्या सामर्थ्याचा गुणगौरव केला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. काही लोकांनी व्हॅक्सिनेशन इज नॉट बिग डील असं काही म्हटलं. भारताने एवढी मोठी कामगिरी केली आहे, ही कामगिरी वाटत नाही का? एका खासदाराने तर लसीकरणावर व्यर्थ खर्च होत आहे असं म्हटलं.. देशानं ऐकलं तर काय म्हणेल? कोरोना जेव्हापासून मानव जातीवर संकट निर्माण करत आहेत तेव्हापासून सरकारने या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केलं आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

रोजगार वाढवण्यासाठी मोठी घोषणा

पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात सरकारनं केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली. कोरोना संकटात शेती आणि सूक्ष्म, लघु उद्योगांनी अर्थव्यवस्थेला हात दिला. अनेक विकासकामं, प्रकल्पं मार्गी लागले. कोरोना संकट काळात भारतानं केलेल्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक होत आहे. हे यश देशातील १३० कोटी नागरिकांचं असल्याचं मोदी म्हणाले.

विविध क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रगतीची माहिती मोदींनी राज्यसभेत दिली. यावेळी त्यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. यापुढे २०० कोटीपर्यंतच्या कामांसाठी ग्लोबल टेंडर काढण्यात येणार नाही. अशी कामं भारतातील कंपन्यांनी दिली जातील. त्यामुळे रोजगार वाढतील. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल, असं मोदी म्हणाले.

मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे आपल्या देशाचं कौशल्य आहे. संकटाला आपण धीरानं सामोरे गेलो. त्याचं श्रेय देशवासीयांना जातं. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं.

कोरोना काळात कोणकोणती कामं झाली त्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. घरासाठी येणारा खर्च पाहता आता या व्यक्ती लखपती झाल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं. कोरोना काळात ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसला. शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं आणि अर्थव्यवस्थेला हात दिला, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button