महाराष्ट्राला दिलासा; २४ तासात ७४०४५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : राज्यात करोनाचा उद्रेक कायम आहे. गेले काही दिवस सातत्याने ६० हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची दररोज भर पडत आहे. त्यात काल आणि आज मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा सात लाखांच्या आत ठेवण्यात यश आलं आहे. मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी गुरुवारी रात्रीपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच महाराष्ट्राला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ८३६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्याचवेळी एकाच दिवसात ७४ हजार ४५ इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये असं पहिल्यांदाज घडलंय, जेव्हा नव्या बाधित रुग्णांच्या संख्येपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात आज ७७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबईत गेल्या ३ दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातूर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात मुंबईत ९ हजार ५४१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ७ हजार २२१ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचा मुंबईतील दर ८४ टक्के आहे. मुंबईत सध्या ८१ हजार ५३८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवर पोहोचलाय. दरम्यान, मुंबईतील मृतांची संख्या मात्र चिंताजनक बनत चालली आहे.
पुणे महापालिका हद्दीत सलग पाचव्या दिवशी नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येची आकडेवारी कोरोनामुक्त रुग्णसंख्येपेक्षा कमी नोंदवली गेली आहे. आज पुण्यात ५ हजार ६३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार ४६५ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पुण्यातील मृतांची संख्या चिंताजनक बनली आहे. पुण्यात आज दिवसभरात ५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या ५० हजार ३२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजच्या आकडेवारीनुसार पुण्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ९१ हजार ४९५ वर पोहोचली आहे. त्यातील ३ लाख ३४ हजार ७८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत ६ हजार ३८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.




