Top Newsफोकसमुक्तपीठ

माणसा ! कधी होशील रे तू माणूस..!

- विजय बाबर

कुळगाव बदलापूर (पूर्व) येथील आदर्श विद्या प्रसारक संस्थेच्या आदर्श विद्या मंदिरातील दोन चिमुरड्यांवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय, घृणास्पद, हिंस्त्र श्वापदापेक्षा क्रूर, अघोरी, संतापजनकच आहे. या निमित्ताने बदलापूरकरांनी केलेले आंदोलन ही केवळ त्या एका घटनेची प्रतिक्रिया होती असे दिसत नाही. अलीकडच्या काळात राज्यभरात होत असलेल्या अनेक प्रकरणांमधील जनतेच्या मनातील तीव्र संतापाची ती प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती. आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना, सरकारला, प्रशासनाला आणि पोलिसांनाही हा एकप्रकारे इशाराच आहे.

नराधम अक्षय शिंदे

मागील काही महिन्यांमध्ये आरक्षण, राजकीय नेत्यांनी दोन समाजात प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली तेढ, धार्मिक वाद, पोलिसांची संशयास्पद भूमिका, निर्लज्ज नेत्यांची वक्तव्ये आदी कारणांमुळे जनतेच्या मनात राग धुमसत होता. एका बाजूला वेदनेने तडफडणाऱ्या मुली, महिला तर आणि दुसऱ्या बाजूला महिला सुरक्षिततेकडे कानाडोळा करून केवळ मतांसाठी बहिणींच्या पदरात भिक देत सत्ताधाऱ्यांकडून साजरा होत असलेला लाडक्या बहिणीचा उत्सव हा अत्यंत घृणास्पद, लाजीरवाणा आणि संतापजनक प्रकार आहे. त्यातच केवळ सत्तेसाठी निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या नावाखाली आपलेच गुणगान करीत राज्यात भपकेबाजी करत फिरणाऱ्यांना जनतेचा राग बदलापूरच्या निमित्ताने दिसून आला असेल. बदलापूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही. तरीही जनतेचा स्वयंपूर्ण उठाव आणि तीव्र प्रतिक्रिया का उमटली याचा आता सरकारने, राजकीय पक्षांनी, प्रशासनाने आणि पोलिसांनीही सारासार विचार करण्याची गरज आहे.

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवरील अत्याचाराची घटना १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. दोन मुलींपैकी एका मुलीच्या पालकांना १३ ऑगस्ट रोजी संशय आला, त्यांनी दुसऱ्या मुलीच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलल्यानंतर आपण लैंगिक अत्याचाराची तक्रार करण्यास जात असल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अहवालात तिच्या हायमेनचा भंग झाल्याचे दिसून आले. मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती. तिने तिच्या पालकांना सांगितले की अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने ‘घात’ केला. दोन्ही मुलींच्या पालकांनी या घटनेची माहिती १६ ऑगस्ट रोजी पोलिसांना दिली होती. परंतु, पोलिसांनी १२ तासांनंतर म्हणजे १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास गुन्हा नोंदवून घेतला.

बदलापूरमधील जनतेच्या उद्रेकानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे, एक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले आहेत. दुसरीकडे आदर्श विद्या मंदिरने माफीनामा जाहीर केला. मुख्याध्यापिकेसह मुलांची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांनाही निलंबित केले. या प्रकरणात दिरंगाई झाली. गुन्हे नोंदविण्यात अक्षम्य दिरंगाई झाली. त्यावरुनच जनतेचा क्रोध वाढत गेला आणि उद्रेक झाला.

बदलापूरच्या या दुर्दैवी घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. वर्तमान पत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुरुवातीला या घटनेला फारशी प्रसिद्धी दिलेली नव्हती. मात्र समाज माध्यमांतून वादळाची चाहूल लागली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे गांभीर्याने बघितले नाही. पोलिसांनी अक्षम्य दिरंगाई केलेली आहे, त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण बघतील, असे समजून एकनाथ शिंदे काही काळ शांत राहिले. याचवेळी दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रकरण मॅनेज करतील, असा देवेंद्र फडणवीस यांचा समज झाला. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार तर आपण त्या गावचेच नाही असे समजून लाडक्या बहिणींसमोर मिरवत राहिले. या तिघांच्या राजकारणात हे आंदोलन जास्तच चिघळले गेले. अखेर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना जसे चिरडले गेले त्याच प्रकारे पोलिसांनी अमानुष लाठीमार करून हजारो महिलांसह पालकांचीही फरफट केली आणि तब्बल १०-११ तासांनी आंदोलन मोडून काढले.

या घटनेचे गांभीर्य एवढे आहे की घटना घडल्याचे समजताच मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाने बदलापूरमध्ये तळ ठोकणे गरजेचे होते. पण लाडक्या बहिणीच्या नावाखाली आपला उदो-उदो करीत निवडणुकीच्या राजकारणात मश्गूल असलेल्या नेत्यांना बदलापूरच्या घटनेचे गांभीर्यच लक्षात आले नाही. घटनेनंतर तब्बल ४ दिवसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य त्या कारवाईचे आदेश दिल्याचे, एसआयटी स्थापन केल्याचे, फास्टट्रॅक कोर्टात खटला चालविणार असल्याचे तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याचे सांगितले.
आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी हे भाजपशी संबंधित असल्यामुळेच प्रकरण दाबण्याचा डाव होता, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावर कोणतेही उत्तर न देता विरोधकांना यावर निव्वळ राजकारण करायचे असल्याची टीका गृहमंत्री देवंद्र फडणवीसांनी केली, तर आंदोलनासाठी मुंबईहून लोक बदलापूरमध्ये आले होते असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ, एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केला. दरम्यान, याच म्हात्रे यांनी मंगळवारी आंदोलन सुरू असतनाच महिला पत्रकाराबद्दल अत्यंत हीन पातळीवर टीप्पणी केली होती. ‘वार्तांकन करतेस, जसे काय तुझ्यावरच बलात्कार झालाय’ असे जाहीरपणे बोलून महायुतीचे नेते कोणत्या थराला जात आहेत, याचे एक ओंगळवाणे प्रदर्शनही जनतेला पाहता आले. पश्चिम बंगालच्या घटनेवरून सत्ताधारी भाजप विरोधकांना घेरत होते. भाजपच्या चित्रा वाघांसहीत अनेकांनी कोलकातातल्या घटनेवरून मोर्चा काढला होता. बदलापूरचे आदर्श विद्या मंदिर शाळा भाजपशी संबंधित पदाधिकाऱ्यांची आहे. दुर्दैवाने ती शाळा दुसऱ्या पक्षाशी संबंधित असती तर फडणवीस आणि त्यांचे महिला मंडळ हे त्या शाळेच्या पायरीवर जाऊन बोंबा मारत बसले असते, अशी टीका करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. वास्तविक अल्पवीयन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणात राजकारण होवू नये. त्या मुली अल्पवयीन आहेत. पोलीस तक्रार नोंदवून घेत नव्हते, पोलिसांवर दबाव येत होता, याबाबत काहीच खुलासा होत नाही.

महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात कायद्याचा आणि खाकी वर्दीचा धाक राहिलेला नाही, हे सर्वसामान्यांचे मत बनले आहे. जनतेला ढालीसारखे पुढे करून आपली पोळी भाजून घेणाऱ्या मतलबी राजकीय नेत्यांची आज कमतरता नाही. गंभीर गोष्टीतही फक्त राजकारण करणाऱ्या बिनडोक नेत्यांनी याही प्रकरणात आपला वाचाळपणा दाखवून आपले खायचे दात कोणते आणि दाखवायचे कोणते हे पुन्हा दाखवून दिले. त्यामुळे महाराष्ट्र किती पुरोगामी आहे आणि त्याचे उद्याचे भवितव्य या पुढच्या पिढीच्या हातात किती सुरक्षित आहे चिंता वाटावी अशी एकूण परिस्थिती आहे.

अत्याचार करणारा नराधम कोणत्या जाती-धर्माचा आहे हे न पाहता कारवाईसाठी तत्परता दाखवली पाहिजे. अशावेळी जो व्यवस्थेला वाकवू शकेल, न्याय मिळवून देण्यास भाग पाडेल असा एखादा खमक्या नेता पाहिजे अशी प्रकर्षाने जाणीव होत आहे. आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. ‘एक आई-बाप म्हणून खच्चीकरण होऊन हरलेले हवालदिल पालक,’ अशी आज त्या चिमुरड्यांच्या पालकांची अवस्था झाली आहे. अशी वेळ कोणावरही न येवो. त्या पालकांना यातून सावरण्याचे बळ मिळो आणि त्या नराधमाने केवळ अत्याचार केला, त्या दोन लहान बालिकांचा छळ करून मारून टाकले नाही याबद्दल त्याचे आभार मानावे की काय करावे अशी मनाची द्विधा मनस्थिती झाली आहे. त्या दोघी बिचाऱ्या जीवंत तरी आहेत, पण त्यांच्या मनावर उठलेला हा ओरखडा आता आयुष्यभर विसरला जाणार नाही. केवळ मते आणि सत्तेसाठी लाडक्या बहिणीचे गुण गाणाऱ्या आणि आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या निर्लज्ज राजकीय नेत्यांना याचेही कोणते सोयरसुतक राहणार नाही, इतकी आपली यंत्रणा निर्ढावलेली आहे. असे कोडगे, नालायक, निर्लज्ज राज्यकर्ते आणि राजकीय नेते असतील तर महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित राहतील याची कोणीच खात्री देऊ शकणार नाही. बदलापूरसारख्या प्रकरणामधून कोणी काही शिकणार आहे का, हा मूळ प्रश्न पुढील घटना घडेपर्यंत पुन्हा कायम राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button