
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे रिपोर्ट संध्याकाळी आले. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डाँक्टर रिपोर्ट तपासतील आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील. वरिष्ठ डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांना एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ठाकरे कुटुबीयांशी चर्चा करून घेण्यात आली. तसंच मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल कोणतीही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहीती मुख्यमंत्री कार्यालयच देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
म्हणजे सरकारी हॉस्पिटल चांगले नाहीत : चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. राज्याचे मुख्यमंत्री कसे काय खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल होतात, याचा अर्थ सरकारी रुग्णालये चांगली नाहीत, हे तुम्ही मान्य करता. देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाला तेव्हा त्यांनी सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले. मला खासगी विषयात जायचं नाही, पण ज्याठिकाणी मुख्यमंत्री दाखल असतील, तिथे जाऊन तहसालीदार, कलेक्टर यांनी निवेदन पोहोचवावे. राज्याने पेट्रोल-डिझेलवरील ९ टक्के सेस आणि २४ ते २५ टक्के व्हॅट कमी करावा, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




