
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात चालला आहे. दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यामुळे राज्यात दादा विरुद्ध दादा असा वाद पाहायला मिळत असून चंद्रकांतदादांनी पुन्हा एकदा अजितदादांवर टीका करून या वादाला फोडणी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय १४ महिने जुना आहे, हा विषय आता का काढता? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्याविषयी चंद्रकांतदादांना छेडण्यात आले. त्यावर त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतलं. महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे, असं सांगतानाच १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या कपाटातून ५४ आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी केला.
आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी टीका केली. अजित पवारांच्या वाक्यात दांभिकपणा आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केस नीट चालवली नाही, असं मराठा समाज म्हणत आहे. सरकारने सारख्या तारखा मागितल्या. त्यामुळे कायद्याला स्टे आला. आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असं आम्ही सांगत आहोत. पण सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. आता आयोग नेमलाय. त्याला स्टाफ आणि बळ पुरवा, असा टोला त्यांनी लगावला.




