
औरंगबाादः पुण्यातील फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील यांच्यापाठोपाठ औरंगाबादमध्येही मनसेतील अस्वस्थता उघड झाली आहे. औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे यांनी ही अस्वस्थता बोलून दाखवली. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. १४ डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथेंबाबत अशी कारवाई केल्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता उघड झाली आहे.
जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केल्यानंतर सुहास दाशरथे चांगेलच अस्वस्थ आहेत. माझं काय चुकलं, असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केलाय. ते म्हणाले, मला पदावरून बाजूला केलं आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. पण माझा एकच प्रश्न आहे. साहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय, कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा खूप मोठा प्रश्न मनात आहे. राज ठाकरेंनी जी जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे. ती निष्ठेनं पार पाडायला मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्रसैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, संतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला हवं आहे.
अनेक महिन्यानंतर औरंगाबादेत आलेल्या राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकारीणीत मोठे बदल केले. यात सर्वात मोठा बदल म्हणजे जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे यांची उचलबांगडी केली. मनसे सोडण्याच्या तयारीत तुम्ही आहात का, असा प्रश्न विचारल्यावर सुहास दाशरथे म्हणाले, माझ्याकडे आज फक्त दोन गोष्टी आहेत. निष्ठा आणि स्वाभिमान. शिवसेनेत असतानाही मी त्याच निष्ठेनं आणि स्वाभिमानानं काम केलं, आजही त्याच गोष्टींच्या आधारे काम करतोय. यावर राजसाहेब जो निर्णय घेतील, त्यानुसारच मी काम करेन.