महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : गुलाब चक्रीवादळानंतर आता शाहीन चक्रीवादळाचा परिणाम आता अनेक राज्यांवर होत असल्याचे दिसत आहे. हवामान विभाग मान्सून परतण्याबाबत बोलत असतानाच काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आता देण्यात आला आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यावर दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीवर एक चक्रीय अभिसरण तयार झाले आहे. एका कमी दाबाच्या क्षेत्रापासून पूर्व झारखंडमधील उत्तर ओरिसापर्यंत कमी दाबाची रेषा पसरली आहे. यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडूत पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये ६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर गोवा, दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रामध्ये ८ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. स्कायमेटनुसार ६ ऑक्टोबरपासून मान्सून परतण्यासाठी स्थिती अनुकूल होत आहे. पुढील २४ तासांत आसाम, मेघालय, नागालँड, तामिळनाडू, केरळ, अंदमान आणि निकोबार लक्षद्विपच्या काही भागांवर मध्यम पाऊस पडू शकतो.