Top Newsराजकारण

वानखेडे विरूद्ध नवाब मलिक खटल्याचा निकाल सोमवारी

मुंबई : वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या कोर्टातील खटल्याचा निकाल सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता जाहीर होणार आहे. न्यायमूर्ती माधव जामदार हे आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार असल्याचं त्यांनी गुरूवारी सांगितलं. नवाब मलिक आणि ज्ञानदेव वानखेडे दोघांकडूनंही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागण्यात आली होती. हायकोर्टाने ही विनंती मान्य केली आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला, दाखल्याचा फॉर्म आणि नाव बदलल्याचा दाखला कोर्टात सादर केला. तर ज्ञानदेव वानखेडे यांनी आपलं जातीचं प्रमाणपत्र आणि समीर वानखेडेंचा जन्म दाखला कोर्टात सादर केला. अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी ही कागदपत्रे दोन्ही बाजूंनी दाखल झाल्यामुळे सोमवारी हायकोर्ट काय निकाल देणार याची उत्सुकता आहे.

ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यात वानखेडेंच्या जातीबाबत खुलास करत नवाब मलिकांना नव्यानं प्रतिज्ञापत्र कोर्टापुढे सादर करायचं होतं. मात्र हायकोर्टातील याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला असल्यानं आता पुन्हा नव्यानं यात काही दाखल करायचं असल्यास त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक होतं. त्याच परवानगीसाठी गुरूवारी नवाब मलिकांच्यावतीनं कोर्टाकडे विनंती केली गेली जी कोर्टानं मान्य केली. यावेळी वानखेडेांच्यावतीनंही एक प्रतिज्ञापत्र यासंदर्भातील काही पुरावे कोर्टात सादर केले गेले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मलिकांनी आपला ‘दाऊद’ असा केलेला उल्लेख आणि समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा केलेला दावा चुकीचा आहे. तसेच नवाब मलिकांनी एकापाठोपाठ एक आरोप करत संपूर्ण वानखेडे कुटुंबियांची सुरू केलेली बदनामी तत्काळ थांबवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांच्या शाळेचा प्रवेश अर्ज, शाळा सोडल्याचा दाखल्यावर मुस्लिम असं लिहिलेलं आहे. ती कागदपत्रे मुंबई महापालिकेच्या कार्यालयातून नुकतीच मिळाल्याचा दावा मलिक यांनी यात केलेला आहे. तसेच समीर यांनी मुस्लिम असूनही राखीव गटातून केंद्र सरकारची नोकरी मिळवली, असा गंभीर आरोपही मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे, वानखेडे यांनी मात्र मलिक यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मलिक जाणीवपूर्वक वानखेडे कुटुंबियांवर निराधार आरोप करुन लक्ष्य करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आपले नाव दाऊद नसून आम्ही मुस्लिमही नाही. तर समाज माध्यमांवर केलेल्या पोस्ट अधिकृतपणे कागदपत्रे मिळवून टाकल्याचा दावा मलिक यांनी हायकोर्टात केला आहे. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर हायकोर्ट सोमवारी काय निकाल देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button