
साउदम्पटन : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात अखेर न्यूझीलंडने बाजी मारली आहे. वास्तविक पाहता गेल्या पाच दिवसांपासूनचा खेळ पाहता टीम इंडियाला आजच्या दिवशी विश्वविजेतेपद पटकावण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, या सामन्याच्या राखीव दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यासमोर भारताचे शिलेदार फार काळ तग धरु शकले नाहीत. त्यामुळे भारतीयसंघ अवघ्या १७० धावांमध्ये तंबूत परतला. त्यानंतर १३९ धावांच्या माफक आव्हानाला न्यूझीलंडने ८ गडी राखत पूर्ण केलं.
या सामन्यात पावसाने मोठा व्यत्यय आणला. पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे सामना खेळवता आला नाही. त्यामुळे हा सामना सहाव्या आणि राखीव दिवसापर्यंत खेळवण्यात आला.
भारतीय फलंदाज या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. उपकर्णधार अजिंक्य राहाणे यानेच पूर्ण सामन्यात सर्वाधिक ४९ धावा केल्या. त्याने पहिल्या डावात ४९ धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ विराटने ४४ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक ४७ धावा केल्या. विशेष म्हणजे संपूर्ण सामन्यात एकही खेळाडू साधं अर्धशतकही झळकू शकलं नाही. त्यामुळे भारतीय संघ दोन्ही डावात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरताना दिसला.
पहिल्या डावात भारताने २१७ धावा केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताला चांगली संधी होती. पण दुसऱ्या डावातही भारतीय संघ चांगली कामगिरी करु शकला नाही. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यात अवघ्या १७० धावांपर्यंत पोहोचू शकली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर फार मोठं आव्हान उभं राहू शकलं नाही.
न्यूझीलंडच्या वरच्या फळीतील मातब्बर फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे फारसे टिकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी त्यांना कमी धावांमध्ये रोखलं होतं. त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडची १३५ धावांवर ५ बाद अशी अवस्था होती. पण त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांना रोखण्यात टीम इंडियाला अपयश आलं. किवींच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी विकेट तर सांभाळलीच त्याचबरोबर भारतीय संघाच्या धावांना बरोबरी करत त्यामध्ये आघाडीही घेतली.
कसोटी सामन्यात विजयासाठी भागीदारी निर्णायक ठरतात. या भागीदारीमुळे सामना झुकतो. याचाच प्रत्यय टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. चौथ्या कसोटीत शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी केलेली शतकी भागीदारी प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आहे. पण विराटसेनेला या महामुकाबल्यात भागीदारी करण्यात अपयश आले. इतकंच काय तर मोजक्या एकट्या दुकट्या खेळाडूचा अपवाद सोडला तर, इतर फलंदाजांना आपली छाप सोडता आली नाही. दुसऱ्या डावात भारताला याचाच फटका बसला. टीम इंडियाला पार्टनरशीप करता आल्या नाहीत. छोटेखानी भागीदारी केल्या असत्या तरी, टीम इंडियाला किवींना विजयासाठी मजबूत टार्गेट देता आलं असतं.
या सामन्यात भारतीय संघाकडे न्यूझीलंडच्या तुलनेत चांगले फिरकीपटू नव्हते. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट, टिम साऊथी, कायल जेमीसन या फिरकीपटूंनी धडाकेबाज कामगिरीने आपलं अस्तित्व अधोरेखित करुन दाखवलं. त्यामुळेच सोशल मीडियावर आज भुवनेश्वर कुमारला या सामन्यासाठी घेणं जरुरीचं होतं, अशी चर्चा रंगलेली बघायला मिळाली.
भारताचा पराभव का झाला ?
कोहली म्हणाला की, पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला होता. त्यामळे दुसऱ्या दिवशी फलंदाजी करणे सोपे नव्हते. पण तिसऱ्या दिवशी आमच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. त्याचबरोबर सामन्याच्या आजच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. माझ्यामते भारताने अजून ३०-४० धावा केल्या असत्या, तर न्यूझीलंडला हे आव्हान पार करणे सोपे गेले नसते. भारताच्या गोलंदाजांनी यावेळी चांगली कामगिरी केली. पण फलंदाजीमध्ये नक्कीच आम्ही कमी ठरलो. भारताचा हा सर्वोत्तम संघ आहे आणि आतापर्यंत आम्ही गेल्या दोन वर्षांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. पण फायनलमध्ये न्यूझीलंडने चांगला खेळ केला, त्यामुळे विजेतेपद पटकावल्यामुळे त्यांचे अभिनंदन करायला हवे.
कोहलीला आतापर्यंत आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. यापूर्वीही पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर २०१९ साली झालेल्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे आतापर्यंत कोहलीच्या नावावर आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेचे एकही जेतेपद नसल्याचे पाहायला मिळत आहे.
भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या सलामीवीरांना झटपट बाद केले होते. पण त्यानंतर केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना आर. अश्विनने बाद केले. यावेळी भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची चांगली संधी होती. पण यावेळी चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा २६ धावांवर झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. भारताला हा मोठा फटका बसला. कारण त्यानंतर टेलर आणि कर्णधार केन विल्यम्सन या जोडीने दमदार फलंदाजी केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने या फायनलचे जेतेपद पटकावले.