
मुंबई : त्रिपुरातील अन्यायाविरुद्ध महाराष्ट्रात पडसाद उमटण्याचं, दगडफेक करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सर्व समाज, धर्म, जातींबद्दल सद्भावना असणारं सरकार आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन ते काय साध्य करणार? त्रिपुरातील परिस्थितीची आम्हालाही चिंता आहे. विशेषत: ईश्यानेकडील सीमेवर जी राज्य आहेत तिथे शांतता राहावी, तिथे कुठल्याही कारणामुळे अस्थिरता नांदू नये, ही आमची भूमिका कायम असल्याचं संजय राऊत म्हणाले. त्याचबरोबर त्रिपुरातील ठिगण्या महाराष्ट्रात उमटू नयेत. भाजपला देशभरात अशा प्रकारची अस्वस्थता निर्माण करुन २०२४ च्या निवडणुकीत उतरायचं आहे, असा घणाघाती आरोप करून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे.
त्रिपुरातील कथित घटेनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नांदेड, अमरावती आणि मालेगावमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी जमाव हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं. या तिन्ही शहरात मुस्लिम मोर्चावेळी दगडफेक करण्यात आली. अनेक चारचाकी वाहनं, दुचाकींची मोडतोड करण्यात आली. काही ठिकाणी दुकानंही फोडण्यात आली. याबाबत प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, सरकारने या घटनेची गंभीरपणे देखल घेतली आहे. पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. काही समाजकंटक वातावरण भडकवत असतात त्यांना सोडू नका. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेश दिल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. तसंच राज्यातील काही शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असून समाजाचा माथी भडकवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असं ते म्हणाले.
नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
मुस्लिम समाजाच्या मोर्चावेळी झालेल्या आंदोलनात झालेल्या दगडफेकीच्या घटनेवरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय. ‘हे मोर्चे महाराष्ट्र सरकारनी थांबवले नाही तर हिंदूंचे पण मोर्चे निघतील. हे राज्य सरकारनं लक्षात घ्यावं’, असं ट्विट नितेश राणे यांनी केलंय.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सतर्क राहा, गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश
महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल शहरांमध्ये काही मुस्लिम संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, भिवंडी शहरांचा समावेश आहे. त्रिपुरा घटनेविरोधात काही ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला हिंसक वळण लागले आणि दंगलीची परिस्थिती निर्माण झाली. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठिकाणी नांदेड, अमरावती, मालेगावमध्ये थोडंसं हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझी सर्व मुस्लिम समाजाला विनंती आहे की आपण शांतता राखावी. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मी स्वतः या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्फत मॉनिटरींग करण्याचं काम करतो आहे. याच्यामध्ये जे दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परंतु आज आपण सर्वांनी एक सामाजिक ऐक्य राखणं अतिशय आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनात आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. माझ्या पोलीस बांधवांनाही माझी हीच विनंती आहे ही परिस्थिती आपण संयमाने हाताळावी आणि राज्यात शांतता कशी राहील यासाठी कार्य करावं, असे वळसे पाटील म्हणाले.