विजयन यांना दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
राष्ट्रवादीचे शशिंद्रन पुन्हा मंत्रिपदी, शरद पवारांकडून शुभेच्छा

तिरुवनंतपूरमः माकप नेते पिनराई विजयन ( वय ७६ ) यांनी आज दुसऱ्यांदा केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी विजयन यांना पद आणि गोपनियतेचे शपथ दिली. सेंट्रल स्टेडियममध्ये हा शपथविधीचा सोहळा झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या जावयासह २० आमदारांनी मंत्रीपदाची शपथची शपथ घेतली. सासरे आणि जावई विधानसभा आणि मंत्रिमंडळात समावेश असण्याची केरळमधील ही पहिलीच घटना आहे. तर विजयन यांच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसलाही स्थान देण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे शपथविधी सोहळ्यात काँग्रेसपणित यूडीएफचे नेते सहभागी होऊ शकले नाहीत. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे शपथविधी सोहळा हा मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे निर्देश केरळ हायकोर्टाने बुधवारीच दिले होते. पिनराई विजयन यांनी दुसऱ्यांदा सत्ता मिळवून केरळमध्ये इतिहास घडवला आहे. केरळमध्ये चार दशकांपासून सत्ता बदलाची परंपरा आहे. पण विजयन त्यावर मात केली आहे. विजयन यांच्या २१ सदस्यांच्या मंत्रिमंडळात बहुतेक नवीन चेहरे आहेत. यात ३ महिलांना स्थान देण्यात आलं आहे. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री विजयन सोडून जुन्या चेहऱ्यांमध्ये फक्त जेडीएस नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशिंद्रन यांचा समावेश आहे. शशिंद्रन हे गेल्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते.
Many Congratulations to Shri. A. K. Saseendran on taking oath as a Cabinet Minister of #Kerala. Wishing him the very best for his tenure ahead.@CMOKerala #KeralaCabinet pic.twitter.com/3HYefh29we
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 20, 2021
शरद पवारांकडून शुभेच्छा
कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते शरद पवार यांनी ए. के. शशिंद्रन यांना दुसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
सत्ताधारी आघाडीत समावेश असलेल्या माकप आणि भाकप ने यावेळी मागील सरकारमधील एका मंत्र्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. पण या मंत्र्यांचे खातेवाटपाची घोषणा अद्याप झालेली नाही. पहिल्यांदा मंत्री होणाऱ्यांमध्ये डीवायएफआचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विजयन यांचे जावई पी. ए. मोहम्मद रियास, सीपीएमचे कार्यवाहक राज्य सचिव ए विजयराघवन यांची पत्नी आर. बिंदू , जी. आर. अनिल, चिंचू रानी, पी प्रसाद आणि अहमद देवरकोविल यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. के. शशिंद्रन यांना विजयन यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समितीच्या बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल पटेल या बैठकीत सहभागी झाले होते. शशिंद्रन हे पुन्हा मंत्री होतील आणि ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कॅबिनेट मंत्रिपद हे अडीच-अडीच वर्षे दोन आमदारांमध्ये विभागावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. कुट्टनाडचे आमदार थॉमस के थॉमस यांनी बैठकीत मंत्रिपदासाठी दावा केला होता. पण पक्षाच्या बैठकीत त्यांना पाठिंबा मिळाला नाही.