लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे अनेक व्हीडिओ आता समोर येऊ लागले आहेत. आधी शेतकऱ्यांवर गाडी चढवतानाचा व्हीडिओ समोर आला, त्यानंतर शेतकऱ्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करतानाचा व्हीडिओ समोर आला. आणि आता शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या थार जीपमधून पळतानाचा केंद्रीय मंत्र्याच्या मुलाचा व्हीडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्राने थार जीपखाली चिरडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, आपण घटनास्थळी उपस्थितच नव्हतो असा दावा आता आशीष मिश्रा यांनी केला आहे. मात्र, हा व्हीडिओ खरा ठरल्यास उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात येऊ शकतं.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, शेतकऱ्यांना चिरडल्यानंतर ही जीप पुढं जाऊन थांबते, त्यातून लोक बाहेर पडतात. तेवढ्यात खादीचा कुर्ता घातलेला व्यक्तीही बाहेर पडतो, आणि पळू लगतो असं दिसत आहे. हा खादीचा कुर्ता घातलेला व्यक्ती केंद्रीय मंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशीष मिश्राच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री आशीष मिश्राने याबाबत आधीच सांगितलं आहे की, तो घटनास्थळी गेलाच नाही. ज्या ठिकाणी दंगल म्हणजे पैलवानांच्या कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच शाळेत तो संपूर्णवेळ उपस्थित होता. कार्यक्रमाची जबाबदारी आपल्यावर असल्याने आपण कुठेही गेलो नाही, वाटलंस तर इतरांना विचारा असंही आशीष मिश्रा सांगतो आहे. आशीष मिश्राच्या नावावर असलेली थार जीप, लाखीमपूरमध्ये कशी पोहचली असं विचारल्यावर आशीष म्हणतो की, पाहुण्यांना घेण्यासाठी माझ्या जीपने काही कार्यकर्ते गेले होते, पण त्या कार्यकर्त्यांमध्ये मी नव्हतो.
प्रशासनाने मार्ग बदलला तरी थार जीप जुन्या मार्गाने कशी?
या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा, आशीष मिश्रा आणि योगी सरकारला अडचणीत आणणारा हा प्रश्न आहे. कारण, शेतकरी हेलिपॅडवर आंदोलन करत आहे, हे कळाल्यावर प्रशासनान केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा मार्ग बदलला. त्यांना हेलिकॉप्टरने आणण्याऐवजी त्यांना वेगळ्या रस्तेमार्गाने आणण्यात आलं. याची सूचना आधीच प्रशासनाने आयोजकांना दिली होती. ही सूचना असतानाही, आशीष मिश्राची गाडी लाखीमपूरमध्ये कशी पोहचली हा प्रश्नच आहे. या प्रश्नाचं आशीष मिश्रालाही समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही. त्यात आता समोर आलेला हा व्हिडीओ आशीष मिश्रांच्या अडचणी वाढवू शकतो.