ज्येष्ठ हिंदी पटकथा लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक आणि संवाद लेखक, तसेच अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक सागर सरहदी (Sagar Sarhadi) यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. सागर सरहदी यांना चित्रपट जगातील एक अतिशय कलात्मक लेखक मानले जायचे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या सागर यांनी खाणे-पिणे पूर्णपणे सोडले होते. प्राप्त माहिती नुसार, मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
सागर सरहदी यांनी आपल्या कारकीर्दीतील ‘कभी कभी’, ‘चांदनी’ आणि ‘सिलसिला’ सारख्या सुपरहिट चित्रपटांद्वारे चाहत्यांवर खोल छाप पाडली. एका दीर्घ आजारामुळे रविवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. सागर सरहदी यांचा जन्म 11 मे 1933 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. मात्र, या लेखकाने आपले घर पाकिस्तानात सोडले आणि ते आधी दिल्लीतील किंग्सवे कॅम्प येथे आले. त्यानंतर, मग ते मुंबईतील एक छोट्या भागात वास्तव्यास आले. मोठ्या संघर्षानंतर सागर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळालं.
सागर सरहदी यांना यश चोप्रा यांच्या ‘कभी कभी’ या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने योग्य ओळख मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी पुन्हा आपल्या कारकिर्दीत कधीच मागे वळून पाहिले नाही. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रसिद्ध चित्रपट ‘बाजार’मधून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील, फारुख शेख आणि नसीरुद्दीन शाह प्रमुख भूमिकेत झळकले आहेत. सागर सरहदी या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक होते. या तिन्ही भूमिका त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने निभावल्या होत्या. समीक्षक स्तरावरही या चित्रपटाला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यांनी ‘नूरी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘रंग’, ‘झिंदगी’, ‘कर्मयोगी’, ‘कहो ना प्यार है’, ‘व्यापार’, ‘बाजार’ आणि ‘चौसर’ यासारख्या हिट चित्रपटांसाठी पटकथा देखील लिहिली होती.