अभिनेत्री यामी गौतम अडकली विवाह बंधनात !
मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री यामी गौतम हिने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. यामी गौतमने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर यामी गौतम अभिनित ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात अभिनेत्रीबरोबर विक्की कौशलदेखील मुख्य भूमिकेत दिसला होता.
कोरोना काळात बर्याच छोट्या-मोठ्या कलाकारांनी लग्न उरकली होती. ज्यात आता यामी गौतमच्या नावाचाही समावेश झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन याने देखील जानेवारी महिन्यात आपली बाल मैत्रीण नताशा दलाल हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर आता यामी गौतमने देखील लग्न केले आहे. यामी या वधू वेशामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे चाहते देखील तिच्या या सोशल मीडिया पोस्टवर सतत अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टची सुरूवात पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या कविताने केली होती, तिने लिहिले आहे, “तुझ्या प्रकाशात मी प्रेम करायला शिकले.” अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, ‘आमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाने, आज आम्ही लग्न केले आहे, हा एक अगदी घरगुती सोहळा होता. खूप कमी लोक उपस्थित असल्याने आम्ही हा आनंदी सोहळा आमच्या कुटुंबासमवेत साजरा केला.’
यामी गौतम आणि आदित्य धर हे एकमेकांना ‘उरी’ या सिनेमापासून ओळखतात. आदित्य एक उत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. यामी गौतम आणि आदित्यच्या लग्नाच्या फोटोवर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अभिनेता वरुण धवनने सर्वात आधी हा फोटो लाईक केला होता.
हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम सध्या ३२ वर्षांची आहे. तिचा जन्म २८ नोव्हेंबर १९८८ रोजी झाला. यामी गौतमने ‘उरी’ सारख्या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. याशिवाय तिने तेलुगु आणि तामिळ सिनेमातही दमदार भूमिका साकारल्या आहेत. यामी गौतम ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीतून प्रकाशझोतात आली. त्यानंतर मग तिला २००८-०९ मध्ये ‘चाँद के पार चलो’ ही टीव्ही मालिका मिळाली. त्यानंतर मग यामीने मागे वळून पाहिलं नाही. अनेक छोट्या मोठ्या सिरीयल करताना, तिला तेलुगु आणि तामिळ सिनेमांमध्ये भूमिका मिळाल्या. यामीने २०२१२ मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. या सिनेमातील अभिनयासाठी तिला सर्वोत्तम पदार्पणाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.