Top Newsअर्थ-उद्योगफोकस

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

पुणे : प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज यांचं आज निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बजाज समुहाच्या उभारणीमध्ये राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे. पाच दशकांमध्ये बजाज समूह नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

बजाज यांच्यावर गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना हार्ट आणि लंग्स संबंधित समस्या असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. वृद्धापकाळामुळे उपचाराला फारसा प्रतिसाद मिळू शकला नाही. हळहळू त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ मध्ये झाला होता. बजाज यांनी अर्थशास्त्र आणि लॉमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’ देखील पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राहुल बजाज यांची १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा ही नीरज बजाज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. राहुल बजाज यांना २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

बजाज यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार

राहुल बजाज यांचे पार्थिव थोड्याच वेळात रुबी हॉल हॉस्पिटलमधून त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी आकुर्डी येथील कंपनीत ठेवलं जाणार आहे, त्यानंतर रविवारी संध्याकाळी चार वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शरद पवारांकडून श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल बजाज यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसंच बजाज यांचे काही किस्सेही सांगितले आहेत. पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाची औद्योगिक उभारणी करण्यात काही लोकांचं मोठं योगदान राहिलं आहे. त्यात महत्वाची नावं आहेत. जेआरडी टाटा, किर्लोस्कर यांनी देशाची औद्योगिक पायाभरणी केली. त्यांच्यानंतर दुसऱ्या फळीत राहुल बजाज यांचं मोठं योगदान आहे. हे कुटुंब मूळ वर्ध्याचं आहे. ते गांधी विचारांचे होते. त्यांचा मुख्य व्यवसाय हा कापसाचा होता. नंतरच्या पिढीने एका वेगळ्या दृष्टीने पुढे जायचा विचार केला. ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठं योगदान राहुल बजाज यांनी दिलं आहे. राहुल बजाज यांच्या कारखानदारीची सुरुवात पुण्यापासून झाली. पिंपरी-चिंचवड हा संबंध औद्योगिक परिसरात ते कदाचित एकमेव उद्योजक असतील, ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे कारखान्याच्या आवारात गेलं. आकुर्डीत कारखान्यात ते राहिले आणि नंतर ते औरंगाबादमध्ये गेले. राज्य सरकार आणि बजाज यांनी मिळून साताऱ्यातही एक कारखाना काढला होता. राहुल बजाज हे वेगळे उद्योजक होते. जे समाजाच्या हिताचे असेल त्याची बाजू ते घ्यायचे. आपली बाजू सरकारला पटेल का नाही याची काळजी ते करत नव्हते, स्पष्टवक्ते होते. त्यांचा राज्यसभेतला काळ हा लक्षात राहील असा होता. राहुल बजाज बोलणार म्हटल्यावर सभागृहात १०० टक्के उपस्थिती असायची, असंही शरद पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर मित्र म्हणून त्यांच्याशी माझा व्यक्तीश: संबंध होता. आमचा दोन पिढ्यांचा संबंध होता. मैत्रीचा ओलावा होता, घरोबा होता, असंही पवार यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button