राजकारण

लसीकरण म्हणजे उपकार नाही, ‘यूजीसी’च्या सूचनेवरुन रोहित पवारांचा संताप

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने अर्थात यूजीसीने देशातील सर्वच विद्यालये, तंत्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. देशभरात १८ आणि त्यापेक्षा वरील वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार कॅम्पसमध्ये फलक लावून मानावेत, अशी सूचना आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी व्हॉट्सअप संदेशातून विद्यापीठांना केली आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी युजीसीच्या सूचनेला विरोध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन आठवड्यापूर्वी देशभरात २१ जूनपासून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. त्यानुसार, देशात २१ जून रोजी देशात तब्बल ८० लाख लोकांचे रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आले आहे. त्याबद्दल मोदींनी ट्विरवरुन देशवासीयांचे अभिनंदन करत वेल डन इंडिया.. असेही म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या गतीमान लसीकरण मोहिमेचे आभार मानण्याच्या सूचना विद्यापीठा अनुदान आयोगाने केल्या आहेत. मात्र, या सूचनेवरुन आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून केलं जाणारं लसीकरण म्हणजे उपकार नाही, तर कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे. पण, मोफत लसीकरणाबाबत पंतप्रधानांचे आभार मानणारे फलक लावण्याची यूजीसीची सूचना आश्चर्यकारक आहे. कदाचित ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनाही माहीत नसेल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पण मोदींना खूश करण्यासाठी शिक्षण विभागातील मंत्र्यांच्या सूचनेनुसार यूजीसीने हा निर्णय घेतला असावा. आपल्या फायद्यासाठी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला राजकारणात ओढणं चुकीचं आहे. कोरोना आणि विद्यार्थी यांच्याबाबत तरी असं राजकारण करु नये!, असेही रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी याबाबत व्हॉटसअ‍ॅपवरुन विविध विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांना रविवारी संदेश पाठवले आणि मोदींचे आभार व्यक्त करणारे फलक सोशल मीडियावरील शैक्षणिक संस्थांच्या वेबपेजवर प्रसिद्ध करावेत, असे सांगितले. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे मान्यताप्राप्त डिझाईन हे हिंदी आणि इंग्रजी भाषेतून उपलब्ध असेल आणि ते सोशल मीडियाला जोडावे. या डिझाईनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असून ‘धन्यवाद पीएम मोदी’ असा आशयही लिहिण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button