विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर; वळसे-पाटलांचा हल्लाबोल
नागपूर : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी दीक्षाभूमी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.
राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरु आहे, काही नेते रडारवर आहेत. याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारले असता, त्यांनी केंद्राच्या तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय, हे कधी होत नव्हतं, अशी टीका केली.
नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांचे काही आक्षेप एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर असतील तर ते असू शकतात. राज्यातील पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी जिल्हास्तरावर बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
परमवीर सिंग यांच्या प्रकरणातील चौकशी आयोगाचा अहवाल अजून राज्य सरकारकडे आला नाही. एकदा चौकशी आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे आला की त्यानंतर परमबीर सिंग यांच्या संदर्भात पुढची कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली.
रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात कोणत्या प्रकरणात त्यांना आरोपी करायचं की नाही करायचं यासंदर्भात न्यायालयीन विषय असल्यामुळे न्यायालयात उत्तर दिले जाईल, असंही वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
नवाब मलिक यांनी एनसीबीवर आरोपांच्या फैरी झाडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंं आहे. यावर बोलताना वळसे पाटील म्हणाले, नवाब मलिक यांची एनसीबी विभागासंदर्भात तक्रार आहे असे दिसते. त्यामुळे एनसीबीविरोधात ते सातत्याने आवाज उठवत आहेत, त्याबद्दल बोलत आहेत.
राज्य सरकारकडून समीर वानखेडेंची चौकशीचे आदेश देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ते केंद्र सरकारच्या यंत्रणेमधून काम करत आहेत. तसेच नवाब मलिक यांनी नेमकं काय विधान केलं, याबाबत मला फारशी माहिती नाही. त्यांनी यासंदर्भात अद्याप कुठलेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. मात्र सध्यातरी मला याबाबत काही माहिती नाही, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.