पंतप्रधान मोदी – योगी आदित्यनाथ भेटीनंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

नवी दिल्ली: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातही राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवी दिल्लीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याबाबत आता उत्सुकता कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यास योगी आदित्यनाथ अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला जात आहे. यामुळे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेश जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवास्थानी गेले होते. या दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय महत्वपूर्ण चर्चा झाली? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरूवारी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली व त्यांच्यात जळपास दीड तास चर्चा झाली. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर योगी आदित्यनाथ भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, भाजपा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व बदलाबाबत सध्या तरी विचारात नाही, मात्र अन्य काही महत्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. भाजपाचे वरिष्ठ नेता बी. के. संतोष यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून जवळपास आठवडभरापूर्वी उत्तर प्रदेश सरकारबाबत आढावा घेण्यात आला होता. तसेच उत्तर प्रदेशमधील मंत्री, खासदार, आमदार आणि मुख्यमंत्र्यांसोबत संतोष यांनी बैठक घेतली होती.