पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात होता. मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या आघाडीच्या स्वप्नांना सुरुंग लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, सध्या शिवसेनेची १० जणांची यादी तयार आहे. परंतु अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या ठिकाणी आल्यावर आम्ही चर्चा करू आणि अंतिम निर्णय घेऊ असं शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी निवडणुकीच्या रिंगणात तृणमूल काँग्रेस हा पक्षही उतरल्यानं त्याचा फटका काँग्रेसला बसेल का हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसबरोबर आमची काही काळ चर्चा नक्कीच झाली. पण गोव्यातली काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे. पण ठीक आहे त्यांना तरंगू द्या, तडाखे बसतात मग. शिवसेना स्वतंत्रपणे लढेल आणि शिवसेना इथे पहिल्यांदा निवडणूक लढत नाही. प्रत्येक निवडणुकीतून शिवसेना इथे वाढतच गेली आहे, संजय राऊत म्हणाले. दरम्यान, गोवा निवडणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका काय याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. आदित्य ठाकरे यांनीदेखील एक टीम यासाठी पाठवली आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर मुंबईतील प्रमुख लोक या ठिकाणी येऊन काम करतील आणि मार्गदर्शनही करतील. निवडणुकीला पुढे घेऊन जातील, असंही राऊत म्हणाले. तृणमूल काँग्रेसचे इकडचं काम पाहणारे जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. सर्वांनी एकत्र यावं ही आमची इच्छा आहे. पण यात त्याग कोणी करायला तयार नसतं. प्रत्येकाला दुसऱ्यानं त्याग करावं असं वाटतं. या सगळ्या वादात पडू नये असं ठरवलं आहे. आम्ही ज्या काही जागा लढवतोय त्यापैकी काही जागांवर अधिक लक्ष देऊ, असंही ते म्हणाले. शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमूल एकत्र येण्याची वेळ निघून गेल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेमधून लढणारे सर्वच आम आदमी आहेत. आमच्याकडे ओरिजनल आम आदमी आहेत. साफ करण्यासाठी आमच्या एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाणही आहे, असं राऊत आम आदमी पक्षाबद्दल बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी उत्पल पर्रिकर यांच्याबाबत भाजपनं घेतलेल्या भूमिकेवरही मत व्यक्त केलं.
गोवा ही देवभूमी आहे. त्यांच्या तोंडी कायमच नैतिकतेचं भजन असतं. आज भाजपकडे जे गोव्यात उमेदवार आहेत, त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचे, माफियागिरीचे आरोप आहेत. काही ठिकाणी त्यांनी अफू, चरस गांजाचा व्यापार करणाऱ्या लोकांना पक्षात घेतलंय. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?, असाही सवालही त्यांनी केला. फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे, फडणवीसांकडून अशी अपेक्षा नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
कधीकाळी भाजपदेखील सुरूवातीला इथे जेव्हा लढला होता, तेव्हा १२-१३ जागांवर लढला होता. तेव्हा त्यांच्या सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हे राजकारणात निवडणुकांमध्ये हे असे सुरुवातीच्या काळात होत असते. भाजपचे एकदा लोकसभेत ३६० उमेदवारांचे डिपॉझिट गेले होते. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बहुसंख्य लोकाचे डिपॉझिट गेले आहे, म्हणून लढायचे नाही का, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
गोव्यात शिवसेना रुजते आणि रुजली आहे. महाराष्ट्र सरकारचा प्रभाव आहे, ठाकरे सरकारचा प्रभाव आहे, लोक शिवसेनेचे काम करत आहेत. आमचे लोक आणि भाजप विषयी त्यांच्या सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे. इथे जो गोव्यात भाजप दिसत आहे, कुठे आहे पक्ष त्यांचा? कधीही स्वबळावर त्यांचे इथे सरकार आले नाही. मनोहर पर्रिकर होते तेव्हाही. बहुमताच्या आसपास येऊन थांबलेले आहेत आणि मग याचे-त्याचे विकत घे, याचे त्याचे आमदार फोड, फोडा-झोडा व राज्य करा ही भाजपची गोव्यातील नीती आहे. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपला बहुमत मिळणार नाही. लोक निवडून देणार नाहीत हे तुम्ही लिहून ठेवा. शिवसेना साधारण १४-१५ जागा लढेल अशी आमची एक भूमिका आहे, असेही राऊत यांनी सांगितले.