अँटिग्वा : १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने ५ गडी राखून बांग्लादेशवर दणदणीत विजय मिळवला असून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. भारताने ३०.५ षटकात ११७ धावा करून बांग्लादेशचा पराभव केला.
भारताच्या यंग ब्रिगेडने बांग्लादेशला अवघ्या १११ धावांवर रोखलं होतं. त्यानंतर हे माफक आव्हान भारतीय संघाने सहज पार केले. सलामीला आलेल्या अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंह यांनी सावध सुरुवात केली. पण हरनूर सिंह भोपळाही न फोडता आऊट झाला. त्यानंतर आलेल्या राशीद शेख आणि रघुवंशीने दमदार बॅटिंग करत टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.
रघुवंशीने ६५ चेंडूत ७ चौकार लगावत ४४ धावा केल्या. तर राशीद शेखने २६ धावांची खेळी केली. दोघांनी निर्णयाक बॅटिंग करून भारताच्या मार्ग मोकळा करून दिला. पण सिद्धार्थ यादव अवघे ६ धावा करून बाद झाला. तर राज बावा भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर आलेल्या कॅप्टन यश धूल याने टीमची कमान सांभाळली. यश धूलने २० आणि कौशल तांबे याने ११ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केले. बांग्लादेशच्या टीमकडून रिपन मोंडोलने सर्वाधिक ४ गडी मिळवले. तर तंजीम हसन साकिबने एक गडी बाद केला.
त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार यश ढूल याने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपल्या कॅप्टनचा हा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच बांगलादेशला धक्के दिले. बांगलादेशची अवस्था ७ बाद ५६ अशी झाली होती, पण आठव्या विकेटसाठी झालेल्या ५० रन्सच्या पार्टनरशीपमुळे बांगलादेशला १११ धावांपर्यंत मजल मारता आली.
भारताकडून रवी कुमारने सर्वाधिक ३ गडी बाद केले, तर विकी ओत्सवालला २ गडी बाद करण्यात यश आलं. राजवर्धन हंगर्गेकर, कौशल तांबे आणि अंगरिक्ष रघुवंशी यांना प्रत्येकी १-१ गडी बाद केला. बांगलादेशकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावा केल्या.
भारत-पाकिस्तान ‘महामुकाबला’ नाही !
ऑस्ट्रेलियाने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कांगारूंनी पाकिस्तानचा ११९ धावांनी पराभव केला. आता उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाचा पाकिस्तानने पराभव केला असता आणि भारताने बांगलादेशवर विजय मिळवला असता, तर उपांत्य फेरीत भारत पाक महामुकाबला अनुभवण्यासाठी संधी चाहत्यांना मिळाली असती. पण ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेतूनच बाहेर फेकले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने सात गडी गमावून २७६ धावा केल्या होत्या. सलामीवीर टीग वायली ७१ आणि कोरी मिलरने ६४ धावा केल्या. या दोन फलंदाजांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी झाली. दुसरा सलामीवीर कॅम्पबेल केलवेने ४१ आणि कर्णधार कूपर कॉनोलीने ३३ धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार कासिम अक्रमने तीन तर अवैस अलीने दोन गडी बाद केले.
आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ ३५.१ षटकात अवघ्या १५७ धावांवर गारद झाला. मेहरान मुमताजने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याचवेळी अब्दुल फसीहने २८ आणि इरफान खानने २७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून विल्यम साल्झमनने सर्वाधिक तीन खेळाडू माघारी पाठवले.