
नाशिकः नाशिकमध्ये राज ठाकरेंचे मनसे कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज वगैरे लावून जंगी स्वागत केले. मात्र, यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडेय तापले असून, त्यांनी गुरुवारी याबाबत राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते.
नाशिकमध्ये राज ठाकरे येणार म्हटल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांचे स्वागत धुमधडाक्यातच होणार. अगदी असेच घडले. बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राज यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज लावले. मात्र, त्यासाठी परवानगी घेतली नव्हते. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत तिथेही होर्डिंग्ज लावले आहेत. हे होर्डिंग्ज काढण्यासाठी पथक पोहोचले. तेव्हा या पथकातील अधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे पोलिसांनी गर्दी करणे, घोषणाबाजी, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा केला. अधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज हटवल्यानंतर पुन्हा मनसे कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज लावले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक काल हटवल्यानंतर झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील नवीन नियमांची माहिती त्यांना दिली. नाशिकमध्ये कोणताही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांना होर्डिंग्ज लावण्यास मनाई आहे. नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करू. अनधिकृत होर्डिंग्जबाबत मनसेच्या जिल्हाअध्यक्षांशी बोलू, असे पांडेय यांनी सागितले आहे.
पोलिस आयुक्त दीपक पांडेय होर्डिंग्ज प्रकरणावरून चांगलेच संतापले आहेत. कायद्याचे उल्लंघन केल्यास पक्षाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करू. आधी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना याबाबत जाब विचारणार आहे. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. कायदा सगळ्या पक्षांसाठी समान आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाईला समोर जावेच लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
नाशिक शहरात सध्या राजकीय फलक पुन्हा वाढले आहेत त्यामुळे पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी गेल्या आठवड्यामध्ये पोलिसांच्या परवानगीशिवाय आणि फलकवरील मजकूर तपासल्या शिवाय फलक लावता येणार नाही, असा इशारा दिला होता तशी सूचना ही त्यांनी काढलेली आहे. मात्र असे असताना काल राज ठाकरे यांचे नाशिकच्या हॉटेल एसएसके येथे आगमन झाले त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताचे फलक लावले होते दुपारी पोलिस आणि महापालिकेच्या पथकाने हे फलक हटवले यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे.
फेब्रुवारीत निवडणुका
राज्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये १८ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे.