
मुंबई : हिंदीच्या सक्तीविरोधात मराठी माणसाच्या आंदोलनाने सरकारला अध्यादेश मागे घ्यावा लागला. सर्वच मराठीजनांनी ५ तारखेला मोर्चाची हाक दिली होती मात्र मराठी माणसांची एकजूट होऊ नये यासाठीच मोर्चाला घाबरून सरकारने अध्यादेश रद्द केला. मात्र असे असले तरी ५ तारखेला जल्लोष मोर्चा होणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शासनाच्या अध्यादेश रद्द करण्याच्या घोषणेनंतर ५ तारखेचा मोर्चा होणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी जल्लोष मोर्चा किंवा सभा होईल, असे स्पष्ट केले. तसेच सगळ्यांनी बोलून दोन दिवसांत मोर्चा आणि सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करू, असेही सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज पूर्ण राज्यभर आंदोलन झाले. शासनाच्या जीआरची ठिकठिकाणी होळी करण्यात आली. मुंबईत पत्रकार संघासमोरील प्रांगणात मी आंदोलनात सहभागी झालो. मला अभिमान आहे की मराठी माणसांच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली. अशीच शक्ती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी दिसली होती. तेव्हाही त्यांचा डाव उधळला होता, आजही उधळला. आजही मला वैषम्य वाटते, मराठी माणसांची एकजूट तोडण्याचे काही जणांकडून प्रयत्न सुरूच आहेत. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी छान भूमिका घेतली की हिंदीला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. मराठी-अमराठी वाद निवडणुकीच्या तोंडावर सरकारला उभा करायचा होता, पण मराठी माणसाने तो हाणून पाडला.
संकट आल्यावर एकत्र येण्यापेक्षा एकत्र आलो तर संकट येणारच नाही…
मराठीच्या मुद्द्यांवर राज ठाकरे आणि मनसेशी आपण जुळवून घेतले. इथून पुढेही आपण एकत्रित दिसणार का?असे विचारल्यावर, “संकट आल्यावर एकत्र येण्यापेक्षा एकत्र आलो तर संकट येणारच नाही…” असे सांगत राज ठाकरे यांना पुन्हा उद्धव यांनी निवडणुकीच्या राजकारणात एकत्रित येण्याची साद घातली.
मराठी माणूस एकत्र होऊ नये, ५ तारखेला मोर्चा होऊ नये, यासाठी शासनाने लगोलग जीआर केला. भाजप म्हणजे खोट्यांची फॅक्टरी आहे. अफवा पसरवायच्या, खोट्या मार्गाने जिंकायचे, हा भाजपचा धंदा आहे. पण आता मराठी माणसांनी ठरवायचे की एखादे संकट येईपर्यंत वाट बघायची नाही. आपल्याला जाग आली आहे, ती जाग आपल्याला कायम ठेवायची आहे. ५ तारखेला जल्लोष मोर्चा काढणार, कधी कुठे कसा असेल मोर्चा हे लवकरच जाहीर करू.. तरी देखील ५ तारखेला मोर्चा, सभा असणार, सगळ्यांनी बोलून अंतिम घोषणा करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.




