राजकारण

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही : जयंत पाटील

उस्मानाबाद : राष्ट्रवादी स्वबळाची चाचपणी करत नाही. पण काँग्रेस स्वबळाचा आग्रह करत असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं वाटत नाही, असा टोला लगावत काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न करु, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुळजापुरात केलं. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सुरुवात झाली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मंत्री धनंजय मुंडे, नेते संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत उस्मानाबादमधून राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आरंभ झाला. तुळजाभवानी मातेची आरती आणि दर्शन घेऊन त्यांनी परिवार संवाद यात्रेला सुरुवात केली. भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र मंदिर उघडल्यानंतर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडेल. कोरोना असल्याने पक्षप्रवेश रखडले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. पक्ष सोडून गेलेले स्वगृही येण्यास उत्सुक आहेत, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल, असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं.

आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून अनेकांना त्रास दिला जात आहे. इन्कम टॅक्स आणि ईडीचा वापर राजकीय दबाव टाकण्यासाठी केला जातो, हे सर्वश्रुत आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या पत्राने ते अधोरेखित झालं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट टळावे, पावसाळ्यात महाराष्ट्रामध्ये पूरसंकट येऊ नये, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुळजाभवानी देवीला साकडे घातले. मंदिर बंद असल्याने तुळजाभवानी मंदिराच्या दारातूनच जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी दर्शन घेतले. मंदिर खुली करण्याचा निर्णय राज्य पातळीवरच घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, तुळजापूर येथे जयंत पाटलांच्या दौऱ्यात सोशल डिस्टन्ससिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र दिसलं. परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील दोन दिवसांच्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेताना अनेक कार्यकर्ते एकत्रित आल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button