उद्धव ठाकरेंचा कोकणातील पाहणी दौरा म्हणजे निव्वळ देखावा : आ. नितेश राणे
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ देखावा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची बोचरी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.
यावेळी नितेश राणे यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिंमत असावी लागते. नुसता टोप घालून कुणी हिरो होत नाही. सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी उदय सामंत यांना दिले.
गेल्या निसर्ग चक्रीवादळ तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार ? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल मी माहिती घेतली ८ कोटी पैकी फक्त ४९ लाख मिळाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.