मुंबई: मुंबईतील दादरमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत आम्हाला कुणी थप्पड देण्याची भाषा करु नये. एकच अशी थापड देऊ की पुन्हा उठणार नाही, असा इशाराच दिला आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वेळ आली, तर शिवसेना भवन फोडू असे लाड यांनी म्हटल्याने शिवसेनेचे नेते संतापले आहेत. आमदार प्रसाद लाड यांच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत थेट इशाराच दिला.
सतेज पाटील, डबल सीट म्हणाले. पण आपले सरकार ट्रिपल सीट आहे. हे मुद्दामहून बोलतोय. कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डॉयलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता… पण अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत. यापुढेही देऊ. त्यामुळे आम्हाला थापडा मारण्याची धमकी देऊ नये. एकच थापड देऊ की, पुन्हा कधी उठणार नाही. हा शिवसेनेचा हा लढवय्याचा गुण आहे, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना लगावली.
लहानपणापासून माझे चाळीत येणे जाणे होते. आमचे होमिपॅथीचे डॉक्टर इथेच राहायचे. शिवसेनाप्रमुखांच्यासोबत मी चाळीत यायचो. शाहीर साबळेंच्या घरीही जायचो. या चाळीच्या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत नाही. या चाळीने खूप दिले आहे. माझ्या जन्माआधीपासून हा इतिहास आहे. त्या त्या वेळेला ही लोक उभी राहिली. अनेक कवी, गायक, साहित्यीक या चाळीने दिले. अनेक क्रांतीकारक निर्माण झाले, यात चाळीचा वाटा मोठा आहे, अशा काही आठवणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागवल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री पदावर असताना एका चांगल्या कार्याची सुरूवात माझ्या हस्ते होईल, असे स्वप्न कधी पाहिले नव्हते. आता चाळीचा टॉवर करतोय, पण त्यांनी आपल्याला जे दिले ते ऋण आपण फेडू शकत नाहीत. या चाळीच्या इतिहासाची मूळे खोलवर रुजलेली आहेत. स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असे लोकमान्य टिळक म्हणाले, पण त्या स्वराज्यात हक्काचे घर असायला हवे, तेच आम्ही करतोय, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना नमूद केले.