Top Newsराजकारण

कोरोना काळात आंदोलन करणाऱ्या विरोधकांचे मुख्यमंत्र्यांनी कान उपटले!

ठाणे : कोरोना काळातही आंदोलन करणाऱ्या विरोधकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कान उपटले आहेत. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. अमूक सुरू करा, तमूक सुरू करा, असं सांगत आहेत. अरे आंदोलने कसली करताय? कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने मीरा रोड येथे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचा प्लांट सुरू करण्यात आला आहे. या प्रसंगी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, युवासेना सचिव, नगरसेवक पूर्वेश सरनाईक आदी उपस्थित होते. या प्रकल्पाचे लोकार्पण करताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलेच फटकारे लगावले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांट लावण्याची गरज काय आहे, जेव्हाचं तेव्हा बघू असा विचार केला असता तुम्ही. पुढची लाट येईल तेव्हा बघू. पुन्हा एकदा सरकारच्या डोक्यावर बसू असा विचार केला असता तुम्ही. पण प्रताप, तुम्ही तसा विचार केला नाही. तुम्ही ऑक्सिजन प्लांट सुरू केला. पण राज्यात काही जणांचं राजकारण सुरू आहे. लाट ओसरण्यासाठी किती कष्ट करावे लागले याची कोणाला जाण नाही, भान नाही. पण लाट ओसरल्यानंतर अमूक करा नाही तर आम्ही आंदोलन करू, तमूक करा नाही तर आंदोलन करू, असे इशारे दिले जात आहेत. अरे आंदोलन कसली करताय? कोरोना हा काय सरकार मान्य कार्यक्रम नाही. हा काही मोफत कोरोना वाटपाचा कार्यक्रम नाही. आंदोलन करायचे असेल तर जास्तीत जास्त ऑक्सिजन प्लांट लावण्याचं आंदोलन करा ना, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारे लगावले.

जनजीवन सुरळीत झालं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. ते करणारच आहोत. पण ऑक्सिजनचा किती साठा आहे हे आपण पाहिलं पाहिजे. स्पर्धा करायची असेल तर आरोग्यदायी स्पर्धा करायला हवी. शब्दश: अर्थाने ही स्पर्धा हवी. तसेच स्पर्धा करायचीच असेल तर प्रताप सरनाईकच्या कामाशी स्पर्धा करा, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

कुठेही कट करू नका

या कार्यक्रमात प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यासमोर काही मागण्या केल्या होत्या. मध्येच आवाज कट झाल्याने मुख्यमंत्र्यांना या मागण्या ऐकायला आल्या नाहीत. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी कोटी केली. तुमच्या मागण्यांच्यावेळी कट झालं होतं. त्या ऐकू आल्या नाही. एकनाथजी, प्रताप चांगलं काम करत आहे. त्यांना कुठेही कट मारू नका, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हंशा पिकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button