बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गोळीबार
बारामती : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर सोमवारी संध्याकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात तावरे यांच्या पोटात गोळी लागल्याचे सांगण्यात येते. संबंधित घटना बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका हादरला आहे.
रविराज तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. तसेच ते जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. माळेगावातील एक मोठे प्रस्थ म्हणून त्यांची ओळख आहेत. त्यांच्यावर अशाप्रकारे अचानक गोळीबार झाल्याने बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
रविराज हे पत्नीसह संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या ऑडी कारने संभाजीनगर येथे वडापाव घेण्यासाठी आले होते. ते वडापाव घेण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यांनी वडापाव विकत घेतला. दुकानदाराला पैसे दिले. त्यानंतर ते गाडीच्या दिशेला वळले. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात रविराज यांच्या पोटात गोळी लागली आणि ते जमिनीवर कोसळले.
यावेळी त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे गाडीतच होत्या. हे सर्व डोळ्यांसमोर घडताना बघून त्यांना धक्का बसला. त्यांनी गाडीखाली येऊन आरडाओरड सुरु केली. त्यानंतर आजूबाजूचे नागरीक तिथे दाखल झाले. तोपर्यंत हल्लोखेर दुचाकीवरुन पसार झाले. रविराज यांच्या मित्रांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळेचा विलंब न करता तावरे यांना तातडीने बारामतीत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. उपचारासाठी पुण्याहून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आली आहे. दरम्यान, त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. आरोपींनी गोळीबार का केला? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तसेच गोळीबार करणाऱ्यांचा शोध सध्या पोलिसांकडून सुरु आहे.