अमेरिकेत संसद भवनाबाहेर हल्ल्यात २ पोलिसांचा मृत्यू; संशयित कार चालक ठार

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या संसद भवनाच्या (US Parliament House, Capitol Hill) बाहेर एका संशयिताने हल्ला घडवून आणला. यावेळी संसदेच्या बाहेर असलेल्या दोन पोलीस जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या पोलिसांची प्रकृती स्थिर आहे. या पोलिसांनी दोन हात करताना यात हल्ला करणारा संशयित कार चालक ठार झाला आहे. पोलिसांच्या कारवाईत त्यालाही गोळ्या घालण्यात आल्या.
संसद भवनाच्या बाहेर सुरक्षेचे बॅरिकेड तोडत कार चालकांने दोन पोलिस अधिकाऱ्यांना चिरडले. यानंतर सुरक्षेसाठी कॅपिटल आवारात बंदी (Lockdown)घालण्यात आली आहे. कर्मचार्यांना आत किंवा बाहेरही पडण्याची परवानगी नाही. कार्यकारी पोलीस प्रमुख वाय पिटमॅन यांनी सांगितले की, जखमी अधिकाऱ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक होती. जखमी झाल्यावर नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत कारचालकाचाही रुग्णालयात मृत्यू झाल्याचे त्यानी सांगितले. तथापि, पिटमन सांगितले की, अधिकारी आणि मारेकरी कार चालकाची ओळख उघड केलेली नाही. दरम्यान, अधिकाऱ्यांनी ही घटना दहशतवादी हल्ला नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शुक्रवारची घटना आणि 6 जानेवारी रोजी झालेल्या दंगलींचा याच्याशी काही संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार चालकाकडे चाकू होता असे दिसून आले. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात कार चालक जखमी झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कॉंग्रेस कार्यालयाच्या आसपासचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




