Top Newsफोकस

काबुल विमानतळावर २ बॉम्बस्फोट, १५ जणांचा मृत्यू

काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर सलग दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. अमेरिकेन या वृत्ताला दुजोरा दिलाय. दरम्यान, एका मागे एक झालेल्या दोन स्फोटात आतापर्यंत १५ जणांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे, तर अनेकजण जखमी झालेत. या हल्ल्यामागे ईसिस या दहशतवादी संघटनेचा हात आहे.

अफगाणिस्तानच्या माध्यमांनुसार, पहिला बॉम्बस्फोट काबुल विमानतळाच्या एबी गेटजवळ झाला. या घटनेला दुजोरा देताना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, आम्ही काबुल विमानतळाजवळ या स्फोटाची पुष्टी करतो. सध्या या घटनेतील मृतांची माहिती स्पष्ट नाही. तपशील मिळाल्यावर त्याची माहिती दिली जाईल.

रशियन मीडिया स्पुतनिकनं १३ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. तर, फॉक्स न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात ४ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झालाय. विमानतळाजवळील बॅरन हॉटेलजवळ हा स्फोट झाला, तर दुसरा स्फोट विमानतळाच्या अब्बे गेटजवळ झाला. इथेच अमेरिकन सैनिक तैनात होते.

काबुल विमानतळाबाहेर या बॉम्बस्फोटाच्या २४ तास आधी अमेरिकेनं तेथे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली होती. २५ ऑगस्ट रोजी अमेरिकेनं एक अॅडव्हायजरी जारी करुन अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या सर्व नागरिकांना विमानतळावरुन शक्य तितक्या लवकर दूर जाण्यास सांगितलं होतं. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली.

काबुलमध्ये इटालियन विमानावर गोळीबार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये विमानतळावरून उड्डाण करताच इटालियन लष्कराच्या परिवहन विमानावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. इटलीच्या संरक्षण मंत्रालयाने एका सूत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली. या घटनेत विमानाचे कसल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचेही सूत्राने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेसह अनेक देशांनी काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला असताना आणि त्यांच्या नागरिकांना येथून दूर राहण्यास सांगितले असतानाच ही घटना घडली आहे. याच विमानाने प्रवास करणाऱ्या एका इटालियन पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान सुमारे १०० अफगाण नागरिकांना घेऊन जात होते. मात्र, उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामागे कुणाचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. काबुल विमानतळावर इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यासंदर्भातही इशारा देण्यात आला आहे.

अफगाणिस्तान देश १५ ऑगस्टपासून तालिबानने ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांचं रेसक्यू मिशन सुरु आहे. आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सुखरुप अफगाणिस्तानातून आपल्या मायदेशी घरी नेलं आहे. पण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे गर्दिमुळे चेंगराचेंगरीच्या घटना समोर येत होत्या. त्यानंतर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट बॉम्बस्फोटची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. “काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला आहे. आतापर्यंत जखमी आणि मृतकांची संख्या समोर आलेली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जारी केली जाईल”, असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button