सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने भूमिका ठरवू नये : बाळासाहेब थोरात
मुंबई : ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाज माध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्याची ही मुस्कटदाबी आहे असे म्हणत ट्विटरच्या कारवाईचा विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला आणि लोकशाहीच्या हितासाठी आवाज उठवत राहू, लढू आणि संघर्ष करू, असे म्हटले आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यानंतर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप या नेत्यांचेही ट्विटर हँडल ट्विटरकडून निलंबित करण्यात आले आहे. याअगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. यामुळे ट्विटरला नेमकं काय झालंय? काँग्रेसवरतीच कारवाई का होत आहे? असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
ट्विटरच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, आज @TwitterIndia ने माझे ट्विटर हॅण्डल लॉक केले. कारण काय तर म्हणे राहुल गांधीजी यांना समर्थन करणारे ट्विट केले म्हणून! मुळात राहुल गांधी हे लढवय्ये नेते आहेत. निडर होऊन ते सामान्य जनतेच्या सोबत उभे राहतात, त्यांचा आवाज बनतात. राहुलजी यांचा आवाज दाबण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. खरेतर ट्विटर हे समाजमाध्यम आहे, तेथे आपण आपले मत मांडू शकतो. लोकशाहीमध्ये हा मत मांडण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे. आमचे नेते राहुलजी आणि आम्ही काँग्रेसजन ट्विटरच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो.
ट्विटरने काही दिवसांपूर्वी राहुलजी गांधी यांचे अकाऊंट लॉक केले आणि आज काँग्रेस पक्षाच्या अधिकृत @INCIndia, @INCMaharashtra या हॅण्डलसह अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची हॅण्डल लॉक केली. आम्ही देशविघातक, धार्मिक द्वेष वाढविणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारी मते मांडलेली नाहीत. एका पिडीत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हा काय गुन्हा आहे का? असा सवालही थोरात यांनी विचारला आहे.