राजकारण

आमच्या पक्षातील लोकांना मंत्री केल्याबद्दल भाजपचं खरं कौतुक; जयंत पाटलांचा टोला

मुंबई : भारतीय जनता पक्षाचं कौतुक आहे. त्यांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आमच्या पक्षातून गेलेल्यांना संधी दिली. याचा अर्थ भाजप पक्ष मूळचा किती कमकुवत आहे हे सिद्ध होतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा समाचार घेतला. राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी दिल्लीतील सरकार सगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे. झोटींग समितीने अहवाल दिला आहे की, एकनाथ खडसे यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. तरीदेखील ही कारवाई सुरू आहे. तरीदेखील खोटेनाटे आरोप करून खडसे यांच्या जावयाला अडकवण्याचा प्रकार सुरू आहे. खडसेंची तब्येत ठीक नाही परंतु प्रकृती अस्वस्थेचं कारण देऊन चौकशीला येणं एकनाथ खडसेंनी टाळलं अशी चर्चा होऊ नये म्ह्णून आजारी असताना सुद्धा ते ईडीच्या चौकशीसाठी गेले आहेत. सकाळपासून आत्तापर्यंत चौकशी चालू आहे. एका जेष्ठ नेत्याला असं वागवन अतिशय चुकीचं आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

मागे यांनी दीड दोन वर्षे छगन भुजबळ यांना देखील जेलमध्ये टाकलं होतं. माझी भारतीय जनता पक्षाच्या म्होरक्यांना विनंती आहे की सुडाचं राजकारण करू नका. गुन्हा झाला असेल तर कोर्टात जा, कोर्टानं सांगितलं तर शिक्षा ही व्हायलाच हवी.

दरम्यान नारायण राणे यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, नारायण राणेंकडे मायक्रो कंपनीची जबाबदारी दिली आहे. आम्ही अवजड उद्योग समजत होतो. परंतु हा नवीन विभाग त्यांना दिला आहे. त्यामुळे मायक्रो उद्योग विभागातून ते कसा न्याय देतील हे पाहायचं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात बऱ्याच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पदं काढून घेतली गेली आहे आहेत. कदाचित त्यांचा उपयोग पूर्ण झाला असेल. त्यामुळे त्यांना बाजूला केलं आहे. नुकतेच लोकल सुरू करण्याबाबत रावसाहेब दानवे जरी बोलले असले तरी कोविड कमी झाला की लोकल सुरू होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

विरोधकांनी लक्षात ठेवावं आमच्याकडे देखील सक्षम यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही ‘टीट फॉर टॅट’ या म्हणी प्रमाणे वागणार नाही. परंतु जर कोणी सापडलं तर कारवाई नक्की होईल. मात्र हे नक्की आहे की भाजपचं अति होत आहे. काही वर्षांपूर्वी जनता दलाचं सरकार होतं. त्यावेळी त्यांनी इंदिराजींना अटक केली होती. परंतु लोक ही बाब पाहत होते. नंतरच्या निवडणुकीत मात्र लोकांनी इंदिरा गांधींना निवडून दिलं. सुडाचं राजकारण यांनी सध्या सुरू केलं आहे. सरकार पाडण्यासाठी यांचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोक हुशार असतात. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून लोकं निर्णय घेतात. लोकं त्यांना नक्कीच नाकारतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button