Top Newsराजकारण

कोलकाता महापालिकेत तृणमूलची ‘दीदीगिरी’ कायम, भाजपचा दारुण पराभव

तृणमूलला १४४ पैकी १३४, तर भाजपला केवळ ३ जागा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व कायम असल्याचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिलं आहे. कोलकाता महापालिका निवडणुकीत तृणमूलने १४४ पैकी १३४ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत तृणमूलने भाजपचा सुपडा साफ करत निर्विवाद विजय मिळवला आहे.

कोलकाता महापालिकेसाठी आज १४४ जागांची मोजणी झाली. यात तृणमूलच्या खात्यात १३४ जागा गेल्या आहेत. तर भाजपच्या खात्यात अवघ्या तीन आणि काँग्रेस, डाव्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन जागा गेल्या आहेत. तर तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूलला ७१.९५% मते मिळाली आहेत. तर भाजपला फक्त ०८.९४% मते मिळाली आहेत. काँग्रेसला ०४.४७% आणि डाव्यांना ११% टक्के मते मिळाली आहेत.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून कोलकात्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन. कठोर परिश्रम आणि कृतज्ञतेने जनतेची सेवा करा. आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल कोलकात्यातील नागरिकांचं मनापासून आभार मानते, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

द्वेष आणि हिंसाचार नाकारला

या निकालावर तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. बंगालमध्ये द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला थारा नसल्याचं कोलकाताच्या जनतेने दाखवून दिलं आहे. इतका मोठा कौल दिला. आम्हाला आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी कोलकात्याच्या जनतेचा आभारी आहे, असं ट्विट बॅनर्जी यांनी केलं आहे.

एकूण जागा- १४४
तृणमूल काँग्रेस – १३४
भाजप – ३
डावे – २
काँग्रेस – २
इतर – ३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button