तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सायोनी घोष यांना हत्येच्या आरोपात अटक

नवी दिल्ली: भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सायोनी घोष यांना त्रिपुरा पोलिसांनी अटक केली आहे. सायोनीला आगरतळा येथे हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. सायोनी तृणमूलच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष आहेत. अतिरिक्त एसपी(शहर) पश्चिम त्रिपुरा, बीजे रेड्डी यांनी सांगितले की, प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. भा.दं.वि. कलम ३०७, १५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या सभेत शनिवारी रात्री व्यत्यय आणल्याचा आरोप भाजपच्या एका कार्यकर्त्याने सायोनी घोषवर केला आहे. घोष सभेच्या ठिकाणी पोहोचल्या आणि ‘खेला होब’ अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. सायोनी घोष यांना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या भेटीच्या २४ तास आधीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सायोनी घोष यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या १२ तृणमूलच्या खासदारांचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले आहे. त्रिपुरातील कथित पोलिस क्रूरतेबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. तृणमूल सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाचे कार्यकर्ते आणि खासदार उद्या सकाळी दिल्लीत धरणे आंदोलन करणार आहेत.
त्रिपुरात तृणमूल नेते कुणाल घोष यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यादरम्यान काही पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर अटक करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या सायोनी घोष यांना पोलिस ठाण्यात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. सत्ताधारी भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर त्रिपुरा पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सायोनी घोष यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन त्रिपुराच्या भाजप सरकारवर राजकीय पक्षांच्या शांततापूर्ण निषेधाच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप केला.
ममता बॅनर्जी आजपासून ३ दिवस दिल्लीत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीचा दौरा करणार असून, विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्याबरोबरच संसद अधिवेशनासाठी रणनीती तयार करणार आहेत. संसदेचे अधिवेशन २९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
कृषी कायदे रद्द करण्याचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित केला जाणार आहे. तीन कृषी कायदे मागील वर्षी संसदेत गदारोळामध्ये मंजूर करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधानंतर ते रद्द करण्यात आले. ते कायदे रद्द केल्याची प्रक्रिया या अधिवेशनात केली जाण्याची शक्यता आहे. ममता दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटण्याची शक्यता आहे. राज्याची थकबाकी व बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढविण्यासारख्या अनेक मुद्यांवर त्या मोदींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्या विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.
ममता बॅनर्जी यापूर्वी जुलैमध्ये दिल्लीत आल्या होत्या. एप्रिल-मेमध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्या प्रथमच दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळीही विरोधकांचे ऐक्य करण्यावर त्यांचा भर होता. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) अधिकार क्षेत्र आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किलोमीटरहून ५० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्या मुद्यावर त्यांनी यापूर्वीच आक्षेप नोंदविलेला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपल्या भावना कळविलेल्या आहेत. या दौऱ्यातही ममता हा मुद्दा उपस्थित करतील, असे सूत्रांनी सांगितले.