राजकारण

तीरथ सिंह रावत यांना उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

देहरादून – उत्तराखंडमधील राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर. आता भाजपने तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली आहे. तीरथ सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने काँग्रेसमधून आलेल्या सतपाल महाराज यांच्यासाठी तीरथ सिंह रावत यांचे तिकीट कापले होते.

तिकीट कापले गेल्यानंतरही तीरथ सिंह यांनी ना पक्ष सोडला, ना बंडखोरी केली. उलट सतपाल महाराज यांना जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा होता. यामुळेच आता भाजपने त्यांना आधी लोकसभेचे तिकीट दिले आणि आता मुख्यमंत्री पदाचा मुकूट घातला.

तीरथ सिंह रावत भलेही संघाशी जोडले गेलेले असोत अथवा अभाविपच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केलेली असो. पण, बीएस खंडूरी यांचे बोट धरून त्यांनी राजकीय वाटचाल केली आहे. पौडी-गढवाल मतदारसंघातून खंडूरी यांनी जेव्हा-जेव्हा लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा-तेव्हा तीरथ सिंह यांनी त्यांच्या निवडणूक व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. ९०च्या दशकात बीएस खंडूरी आणि तीरथ सिंह रावत यांची जवळीक वाढली आणि यानंतर ते राजकारणात एकमेकांसाठी पुरक ठरले.

1997 मध्ये बीएस खंडूरी यांनी तीरथ सिंह रावत यांना एमएलसीचे तिकीट मिळावे म्हणून संपूर्ण जोर लावला होता. यानंतर ते जिंकून विधान परिषदेतही पोहोचले होते. खंडूरी हे केंद्रात अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. तर 2000 मध्ये उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. यानंतर राज्यात भाजप सरकार आल्यानंतर नित्यानंद मुख्यमंत्री झाले होते. यानंतर खंडूरी यांच्या पुढाकारानेच रावत यांना कॅबिनेटमध्येही स्थान मिळाले होते.

2008मध्ये चौबट्टाखाल मतदारसंघ तयार झाला. 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तीरथ सिंह रावत निवडून आले होते. या निवडणुकीत खंडुरींसह अनेक मातब्बर नेते पराभूत झाले होते. मात्र, 2017 मद्ये काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सतपाल महाराज भाजपत आल्याने तीरथ सिंहांचे तिकीट कापण्यात आले होते.

यानंतर, पक्षाने तीरथ यांना संघटनेत राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आणि हिमाचल प्रदेशचे प्रभारी बनवले. चौबट्टाखाल सीटवर सतपाल महाराज यांना जिंकून देण्यात तीरथ सिंह यांची मोठी भूमिका होती. यावेळी सतपाल महाराज उत्तराखंड सरकारमध्ये पर्यटन मंत्री झाले होते. यानंतर भाजपने 2019मध्ये तीरथ सिंह यांना पौडी-गढवाल येथून लोकसभेचे तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी आपले राजकीय गुरू बीएस खंडुरी यांचा मुलगा मनीष खंडूरी यांना तीन लाख मतांनी पराभूत केला होते.

तीरथ सिंह रावत यांना केंद्रीय राजकारणात जाऊन अद्याप केवळ दीड वर्षच झाले आहे. मात्र, उत्तराखंडमध्ये आमदारांनी त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या विरोधात बंडाचा बिगूल वाजवल्याने भाजपने त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितले आणि संघाची पृष्ठभूमी आणि संघटना तसेच सरकारमधील अनुभव यांचा विचार करत तीरथ सिंह रावत यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button