Top Newsराजकारण

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक; परीक्षा पुढे ढकलल्याने भाजप नेते आक्रमक

पुणे : आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्‍यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणार्‍या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या व या आठवड्यात होणार्‍या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत़ या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

प्रितेश देशमुख (रा. पुणे), संतोष हरकळे आणि अंकुश हरकळे (रा. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रितेश देशमुख हा म्हाडाची परिक्षा घेणार्‍या जी ए सॉफ्टवेअर प्रा. लि. या कंपनीचा अधिकारी असून संतोष व अंकुश हे त्याचे मित्र आहेत. देशमुख याने आपल्या मित्रांच्या मदतीने म्हाडाचा पूर्वपरिक्षेचा पेपर फोडल्याचे सायबर पोलिसांना आढळून आल्याने त्यांनी रात्री उशिरा तिघांना अटक केली आहे.

म्हाडाची पूर्व परिक्षा आज होणार होती. तसेच या आठवडाभर परिक्षा घेण्यात येणार होती. या सर्व परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारी घेण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून सांगतो की, काही अपरिहार्य कारणावरुन व तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी परिक्षा व या आठवड्यात होणार्‍या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परिक्षा जानेवारीमध्ये घेण्यात येतील. ही माहिती मी इतक्या रात्री देत आहे़ की विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी परिक्षा केंद्रावर जाऊ नये़ त्यांनी घरीच थांबावे.

पुणे पोलिसांनी म्हाडाचा पेपर फोडणाऱ्या टोळीवर अशी केली कारवाई

आरोग्य विभागाच्या ‘क’ आणि ‘ड’ वर्गाच्या पेपरफुटीचा तपास करताना म्हाडाच्या पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. आरोग्य विभागाच्या पेपरा फुटीचा तपास सुरु असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भांतही सातत्याने माहिती समोर येत होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनाही सारख्या सांगत होत्या की म्हाडाचा पेपर फोडण्याच्या तयारीत काही लोक आहेत. त्यानुसार आम्ही माहिती घेत आमच्या टीम तयार केल्या. पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे याठिकाणी या टीम पाठवण्यात आल्या. आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. म्हाडाच्या पेपरफुटी संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईबाबत पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

सुरवातीला आम्हाला औरंगबादला काही क्लासेस चालवणारे लोक भेटले.त्यांच्या मोबाईलयामध्ये काहीआक्षेपार्ह गोष्टी आढळल्या , त्यात आरोग्य भरतीच्या पेपरसंदर्भातही माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्याकडं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे डॉक्युमेंट्सही आढळून आली. यात आज परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अडमीटकार्ड आढळून आले. यातूनच आम्हाला माहिती मिळाली. पुढे हरकळ ब्रदर्सपण यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याच वेळी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. देशमुखाकडे लॅपटॉप होता, त्याच्या काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. तसेच अनेक पेनड्राईव्ह ही मिळून आले.

पोलिसांनी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखसह हरकळ बंधूला अटक केली. तेव्हा त्यांच्या फोनवर सातत्याने फोन येत होते. त्यानंतर सर्व माहिती म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांना देत त्यांच्यासोबत जॉईन समन्वयाने ही करवाई करण्यात आली. त्यानंतर पुणे म्हाडाचे नितीन माने पाटील , मुख्य अधिकारी यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर गृहखात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याची माहिती दिली.

आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखसह हरकळ बंधूला अटक करून आज कोर्टात सादर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये जे लोक ताब्यात घेतले आहेत, त्याचा पेपर फुटीशी असलेला संबंध तपासाला जात आहे. या लोकांनी कुणाला पेपर दिलेत याचाही तपास सुरु आहे. म्हाडाच्या या पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे का? : फडणवीस

म्हाडाची परीक्षा रद्द झाल्यावरून विरोधी पक्ष असलेला भाजप चांगलाच आक्रमक झाला असून, याप्रकरणी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. यापूर्वी आरोग्य भरती परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता म्हाडाची परीक्षा रद्द झाल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत, किती दिवस आणि किती वेळा सहन करायचे, अशी विचारणा केली आहे.

फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आरोग्य भरती परीक्षेचा घोळ झाला. पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत गेले आहेत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ आहे. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही. भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस आहे, असे ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.

किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे, राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही, अशी विचारणा करत पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका. दोषींवर कठोर कारवाई कराच. पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून केला आहे.

पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय. परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

आघाडी सरकारला वसुली करण्यात रस : पडळकर

दरम्यान, सरकारला फक्त आणि फक्त टक्केवारी गोळा करण्यात रस असल्याची टीका भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा हिशोब न चुकता एक्सेल शीटमध्ये घेतात. मात्र त्यांना बहुजनांच्या पोरांच्या भविष्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. म्हाडाच्या नोकरभरती परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचे ते स्व:चा गेल्या आठवड्यापासून सांगत आहेत. परीक्षेत घोटाळा झाल्याची त्यांना पूर्वकल्पना होती, गृहखाते देखील राष्ट्रवादीकडे आहे, मग असे असतानाही परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी परीक्षा रद्द करण्याची त्यांच्यावर वेळ आली. महाविकास आघाडी सरकारला फक्त वसुली करण्यात रस आहे, त्यांना पोरांच्या भविष्याची काळजी नाही, असे टीकास्त्र पडळकरांनी सोडले.

विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा; हे तर गोंधळी सरकार : केशव उपाध्ये

विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा; हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार, असं म्हणत भाजपने ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती आहे. या सर्व परीक्षा गोंधळाची न्यायालयीन चौकशी करून दोषींना शासन झालेच पाहिजे. विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा, असं म्हटलं आहे. तसेच तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.

आधी एमपीएससीचा गोंधळ. मग आरोग्य सेवा भरती परीक्षेचा गदारोळ. आदल्या दिवशी परीक्षा रद्द केली. आता तर गृहनिर्माणमंत्र्यांनी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द केली. तरुण – तरुणींच्या भवितव्याशी निर्दयी खेळ चालू आहे. हे कसले आघाडी सरकार हे तर गोंधळी सरकार… असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button