नवाब मलिक यांना धमकीचा फोन !

मुंबई : ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी दावा केला की त्यांना एका व्यक्तीकडून धमकीचा फोन आला, त्या व्यक्तीने त्यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना टार्गेट करण्याविरुद्ध धमकावले आहे. नवाब मलिक म्हणाले की, धमकीच्या कॉल आल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला. सातत्याने धमकीचे फोन कॉल्स येत असल्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराभोवतीदेखील सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याने नंतरच्या कुटुंबालाही लक्ष्य केले होते. त्यांनी प्रश्न विचारला होता की, कोविड -१९ महामारी दरम्यान, संपूर्ण चित्रपट इंडस्ट्री मालदीवमध्ये होती. अधिकारी [समीर वानखेडे] आणि त्याचे कुटुंब मालदीव आणि दुबईमध्ये काय करत होते?
मलिक यांना वेगवेगळ्या राज्यातून धमकीचे फोन येत आहेत. आज (२२ ऑक्टोबर) सकाळी सात वाजता त्यांना धमकीचा फोन आला. नवाब मलिक यांच्या सुरक्षा रक्षकाने हा फोन कॉल उचलला होता. नवाब मलिक यांना शुक्रवारी सकाळी राजस्थानहून एक निनावी फोन कॉल आला होता. या फोनकॉलामध्ये मलिक यांना धमकावण्यात आलं. समीर वानखेडे चांगलं काम करत आहेत. त्यांच्या विरोधात बोलणं बंद करा. अन्यथा महागात पडेल अशी धमकी या फोनकॉलच्या माध्यमातून देण्यात आली. दरम्यान, नवाब मलिक यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. याच कारणामुळे आता त्यांच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी आरोप केला की, ठराविक लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि दुबई आणि मालदीवमध्ये ‘वसुली’ (खंडणी) करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, त्याचे फोटो देखील आहेत.
नवाब मलिक यांनी एनसीबी किंवा समीर वानखेडे यांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. मुंबईतील क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांनी वानखेडेवर आरोप केले होते. नवाब मलिक यांनी दावा केला होता की, समुद्र किनाऱ्यावरील क्रूझ जहाजातून प्रतिबंधित अमली पदार्थांची जप्ती “बनावट” होती आणि अटक फक्त व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे करण्यात आली होती.
मात्र, समीर वानखेडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सर्व काही कायदेशीररित्या केले असल्याचे सांगितले. त्यानंतर एनसीबीने एक निवेदन प्रसिद्ध केले होते की समीर वानखेडे संदर्भात काही चुकीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली गेली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह अनेक लोक क्रूझ ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.